'वारी लालपरीची' फिरते प्रदर्शन रत्नागिरीत दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

बेडफोर्डपासून मॉरिस कर्मेशियल, अलबियन, टाटा मर्सिडीज, बेन्ज, ले लॅण्ड टायगर, एसी कोच, लक्‍झरी कोच, स्लिपर कोच, एशियाड, सुपर डिलक्‍स, शिवनेरी, परिवर्तन बस, शिवशाही, विठाई यांच्या प्रतिकृती व एसटीचा इतिहास मांडणारी लालपरीची वारी आज रत्नागिरीत दाखल झाली.

रत्नागिरी - एसटीच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये अनेकविध प्रकारचे बदल होत गेले. हे बदल उलगडणारे प्रदर्शन पाहून विद्यार्थी, प्रवासी हरखून गेले. बेडफोर्डपासून मॉरिस कर्मेशियल, अलबियन, टाटा मर्सिडीज, बेन्ज, ले लॅण्ड टायगर, एसी कोच, लक्‍झरी कोच, स्लिपर कोच, एशियाड, सुपर डिलक्‍स, शिवनेरी, परिवर्तन बस, शिवशाही, विठाई यांच्या प्रतिकृती व एसटीचा इतिहास मांडणारी लालपरीची वारी आज रत्नागिरीत दाखल झाली. दिवसभरात सुमारे तीन हजार विद्यार्थी, नागरिक, प्रवाशांनी या फिरत्या प्रदर्शनाला भेट दिली. 

रहाटागर बसस्थानकात ही बस आली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि बस फॉर अस फाउंडेशनच्या वतीने 'वारी लालपरीची' हे प्रदर्शन एक जूनपासून सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यात हे प्रदर्शन येथे दाखल झाले. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एसटीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस नगर - पुणे मार्गावर धावली. यंदा 1 जूनला एसटीने 71 व्या वर्षात पदार्पण केले. काळानुरूप एसटी बदलत गेली. एसटीची सेवा अधिक विश्‍वासार्ह होत गेली. 

चित्ररथाचे उद्‌घाटन प्रभारी विभाग नियंत्रक सतीश बोगरे यांनी केले. या वेळी कामगार अधिकारी प्रवीण पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक सतीशकुमार खाडे, आगार व्यवस्थापक अजयकुमार मोरे, सागर गाडे, सहायक वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव, स्थानकप्रमुख तांदळे, वाहतूक नियंत्रक रमेश केळकर, श्रीपाद कुशे आदी उपस्थित होते. 

"एसटीच्या युवा प्रवाशांनी एकत्र येऊन बस फॉर अस फाउंडेशन सुरू केले. एसटीची माहिती सर्वसामान्यांना होण्यासाठी फाउंडेशनने 2016 मध्ये एसटी विश्‍वरथ उपक्रम दोन वर्षे राबवला. वारी लालपरीची उपक्रमात एसटी गाड्यांच्या बांधणीची माहिती मॉडेल आणि छायाचित्रांमधून दिली. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बस उपलब्ध करून दिली असून डिझेलचा खर्च महामंडळ करत आहे.'' 
- रोहित धेंडे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari Lalparichi exhibition in Ratnagiri