नवरात्रोत्सवात मंदिरे खुली करण्याची परवानगी द्याः वारकरी महामंडळ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

या संदर्भात वारकरी महामंडळाचे कोकण विभागीय अध्यक्ष कोकरे महाराज म्हणाले, 17 ऑक्‍टोबरपासून नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. आम्ही नवरात्र काळात सोशल अंतर ठेवून, मास्क वापरून तसेच शासनाच्या नियमावलीचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करु.

चिपळूण ( रत्नागिरी) - कीर्तन आणि प्रवचनातून आम्ही शासनाचा कोरोनासंदर्भातील जनजागृती संदेश लोकांपर्यंत पोहचवू. जिल्हाधिकाऱ्यांनी 10 ऑक्‍टोबरपर्यंत आम्हाला वेळ दिला नाही तर जिल्ह्यातील वारकरी समाज मंदिरे खुली करेल. आम्ही कायदा मोडला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणार असेल तर ते गुन्हे घेण्यास आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन वारकरी महामंडळातर्फे केले. आम्हाला नवरात्रोत्सवात मंदिरे खुली करण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे निवेदन येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिले. 

या संदर्भात वारकरी महामंडळाचे कोकण विभागीय अध्यक्ष कोकरे महाराज म्हणाले, 17 ऑक्‍टोबरपासून नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. आम्ही नवरात्र काळात सोशल अंतर ठेवून, मास्क वापरून तसेच शासनाच्या नियमावलीचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करु. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला चर्चेला बोलवावे. चर्चेतून अनेक गैरसमज दूर करता येतील.

नवरात्रोत्सव काळात आम्ही कीर्तन, प्रवचन करू. राज्यात अनलॉक 5 मध्ये बार, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मग मंदिरे बंद का? असा सवाल वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अभयदादा महाराज सहस्त्रबुद्धे यांनी विचारला. धार्मिक स्थळे खुली करण्यासंदर्भात केंद्र सरकारने काही नियम व अटी लागू केल्या आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील धार्मिक स्थळे सुरू झाली आहेत. रत्नागिरी जिल्हा ग्रामदेवतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सवात 144 कलम लागू करून आमच्या धर्मावर घाला घातला आहे. खेडचे तालुकाध्यक्ष शैलेश आंब्रे, अरविंद्र चव्हाण, दत्ताराम आयरे यांनीही मंदिरे खुली करण्याची मागणी केली. 

चांगले विचार.. 
धार्मिक स्थळे समाजामध्ये चांगले विचार घडवायची मुख्य प्रणाली आहे. नवरात्रोत्सवात ती सुरू झाली पाहिजेत, अशी मागणी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warkari Mahamandal Demand Of Opening Temples In Navratroushav