सिंधुदुर्गला हवामान खात्याचा इशारा, सात जुलैपर्यंत `हा` अंदाज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

आंबेरी (ता. कुडाळ) पुलावर आणि पिसेकामते व बिडवाडी फाट्याजवळ (ता. कणकवली) मोठ्या प्रमाणात नदीला पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिंदर गावठणवाडी (ता. मालवण) येथील दत्ताराम कदम यांच्या घराचे छत कोसळून नुकसान झाले आहे. 

ओरोस (सिंधुदुर्ग) -  जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविला आहे. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 
दरम्यान, आंबेरी (ता. कुडाळ) पुलावर आणि पिसेकामते व बिडवाडी फाट्याजवळ (ता. कणकवली) मोठ्या प्रमाणात नदीला पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिंदर गावठणवाडी (ता. मालवण) येथील दत्ताराम कदम यांच्या घराचे छत कोसळून नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत मालवण तालुक्‍यात सर्वाधित 197 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात सरासरी 121.6 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 181 (1229), सावंतवाडी 20 (1389), वेंगुर्ले 128.8 (1425.8), कुडाळ 145 (1213), मालवण 197 (1742), कणकवली 184 (1211), देवगड 40 (1198), वैभववाडी 77 (1277), असा पाऊस झाला आहे. 

सतर्क राहा... 
आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जोरदार पावसामुळे वेंगुर्ले तालुक्‍यातील महादेव राजचंद्र कामत यांच्या घरावर झाड कोसळून घराची भिंत पडली. कुडाळ तालुक्‍यातील माणगाव येथील आंबेरी पुलावर आणि कणकवली तालुक्‍यातील पिसेकामते व बिडवाडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात नदीला पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे, तरी जिल्ह्यातील नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning of heavy rain konkan sindhudurg