टंचाईची चाहुल, वहिरींनी गाठला तळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

अपेक्षेप्रमाणे अद्यापही मॉन्सूनपूर्व पाऊसही सुरू झाला नसल्याने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जग कोरोनाने हादरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे हात स्वच्छ धुण्याचे आवाहन केले जात आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात विहिरीने तळ गाठल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अपेक्षेप्रमाणे अद्यापही मॉन्सूनपूर्व पाऊसही सुरू झाला नसल्याने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सध्या कोरोनाच्या भीतीने जग हादरले आहे. हा रोग पसरू नये यासाठी स्वच्छता हा कानमंत्र दिला जात आहे. हात धुण्याचे आवाहन केले जात आहे. मे महिना सुरू आहे. या महिन्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. सद्यस्थिती पाहता मॉन्सूनपूर्व पाऊस लपंडाव खेळत आहे. मे संपायला अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे.

गतवर्षी थोडा उशिराने पाऊस आला होता. या वर्षी मॉन्सून लवकर दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सूचित केले होते; मात्र अद्यापही मॉन्सूनपूर्व पावसाचीही चाहूल लागत नसल्याने टंचाई भीषण रूप धारण करू शकते. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाण्याचा वापरही वाढला आहे. अवकाळी पाऊस गेल्या आठवड्यात कोसळला होता. आता त्यानंतर पुन्हा उष्णतेत वाढ झाली. 

बेगमीची कामे पूर्ण 
मॉन्सून सक्रिय होण्यास अजून अवधी असल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी प्रश्‍न गंभीर होऊ शकतो. दुसरीकडे नागरिकांचे डोळेही आभाळाकडे आहेत. विशेषतः शेतकऱ्यांची बेगमीची कामेही पूर्ण झाली आहेत. खरीपाच्या हंगामाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. काही शेतकरी नदी ऐवजी विहिरीच्या पाण्यावरही शेती करतात त्यामुळे त्यांच्या दृष्टीने टंचाई दूर होण्याची गरज तीव्र आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water problem konkan sindhudurg