पाणीटंचाई ३३ गावांत; टॅंकर मात्र एकच हातात!

मेच्या उत्तरार्धात मंडणगड तालुका टंचाईग्रस्त; यंदा धरणे मोकळी केल्याने वाढ
Water scarcity in 33 villages lack of water Tanker supply mandangad
Water scarcity in 33 villages lack of water Tanker supply mandangadsakal

मंडणगड : मे महिन्याच्या उत्तरार्धात मंडणगड तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. यंदा ३३ गावांतील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. गतवर्षी ७ गावांतील ६ वाड्यांनीच या कालावधीत टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. यंदा इतक्या मोठ्या प्रमाणावर गांवे पाणीटंचाईने ग्रस्त झालेली असताना स्थानिक प्रशासनाकडे पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ एक टँकर उपलब्ध आहे.

पणदेरी, भोळवली, चिंचाळी येथील धरणे यंदा कामासाठी बांधकाम हंगामाच्या सुरुवातीलाच मोकळी करण्यात आल्याने यंदा टंचाईग्रस्त गावाचा आकडा दरवर्षीपेक्षा अधिक आहे. डिसेंबर महिन्यापासून संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनाच्यावेळी या बदलेल्या परिस्थितीचे आकलन करण्यात तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कमी पडल्या व या परिस्थितीस सोमोरे जाण्याचे कोणतेही नियोजन केलेले नाही.

मे महिन्यात टंचाईग्रस्त वाड्याचा आकडा वाढत असला तरी नागरिकांची पाण्याच्या गरज भासवण्यास यंत्रणेस अपयश आल्याने नागरिकांना खासगी टँकरने पाणीपुरवठा करून घ्यावा लागत आहे. त्यामुळे खासगी टँकरच्या व्यवसायवाढीसाठी यंत्रणाच प्रोत्साहन देत आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पाणी हा सर्वोच्च प्राधान्यक्रमाचा विषय आहे. सध्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरास नळ ही योजना प्रसिद्ध आहे. अशा प्रकारच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी व योजनेचा आदर्श लाभार्थी होण्यास मंडणगड तालुका जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

७० लाख खर्चाचा टंचाई आराखडा

तालुक्याच्या बनवण्यात आलेल्या टंचाई कृती आराखड्यात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ७० लाखांच्या खर्चाचा हा आराखडा तयार करण्यात आला होता. यातील किती कामे पूर्ण झाली, किती कामे तांत्रिक कारणांमुळे नामंजूर झाली, याचबरोबर टँकरने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करावयाचा झाल्यास जास्तीचे टँकरचे नियोजन केले होते का? त्यासाठी किती खर्च केला आहे? अजूनही किती खर्च अपेक्षित आहे? असे प्रश्न अनुत्तरित आहेत.

माझ्या वयाच्या ३२ वर्षांत मला आजपर्यंत माझ्या पणदेरी भट्टीवाडीवर टँकरने पाणीपुरवठा झालेला मी कधी पाहिला नाही; पण दुर्दैवाने ती वेळ आमच्या समस्त ग्रामस्थ मंडळावर आली आहे. वाडीवर पाणीपुरवठ्यासाठी बाहेरून टँकर मागवावा लागतो. ज्याचे दर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाहीत. वाडी टेकडीवर असल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे.

- गणेश पोस्टुरे, भट्टिवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com