संगमेश्वर तालुक्यात बारमाही नैसर्गिक स्रोतही यावर्षी गायब 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

एक नजर

  • यावर्षीचा उन्हाळा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कडक
  • तालुकाभरातील नदी नाल्यांची पात्र कोरडी
  • नैसर्गिक जलस्त्रोतांनीही मान टाकल्याने संगमेश्‍वर तालुक्‍यात पाणी टंचाईने उग्र रूप
  • हंडाभर पाण्यासाठी महिलांची दिवसरात्र पायपीट

देवरूख - यावर्षीचा उन्हाळा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कडक असल्याने तालुकाभरातील नदी नाल्यांची पात्र कोरडी ठाक पडली आहेत. नैसर्गिक जलस्त्रोतांनीही मान टाकल्याने संगमेश्‍वर तालुक्‍यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे.हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवसरात्र पायपीट करावी लागत आहे. बारमाही नैसर्गिक स्त्रोतही यावर्षी गायब झाले आहेत. 

माणसांप्रमाणेच पशुपक्षांनाही पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली असून पाण्यासाठी मुकी जनावरे तडफडत असल्याचे विदारक चित्र यावेळी पाहायला मिळत आहे. यावर्षी आकडेवारीनुसार टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी वाटत असली तरी वाढलेल्या उकाड्याने पाणी टंचाईची तीव्रता अधिक जाणवत आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यात हेच चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना दिवसरात्र पायपीट करण्याची वेळ आली आहे.

तालुक्‍यातील अपवाद वगळता बहुतांश नद्यांमध्ये पाणीच नाही. पात्रे कोरडी ठाक पडली आहेत. गावागावातील नदी आणि नाले हे पशुपक्षांचे पाण्याचे हक्‍काचे ठिकाण मात्र हीच ठिकाणे कोरडी पडली आहेत. अनेक ठिकाणच्या नद्यांमध्ये डबक्‍यात असलेले अशुध्द पाणी पिण्यासाठी जनावरांची तडफड पाहायला मिळत आहे. घरगुती स्वरूपात पाळीव जनावरांना एकदा देण्याइतके पाणीसुध्दा काही भागात उपलब्ध नाही परिणामी टंचाईच्या झळा या मुक्‍या जनावरांनाही बसत आहेत. 

संगमेश्‍वर तालुक्‍यात आज घडीला 15 गावातील 27 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई सुरू आहे. तालुक्‍यात 2 शासकीय टॅंकरने पाणी पुरवठा सुरू असला तरी पुरेसे पाणी मिळत नसल्याने टंचाईग्रस्त भागातील जनता हैराण झाली आहे. अजूनही मे महिन्याचे 20 दिवस बाकी आहेत. वेधशाळेच्या अंदाजानुसार नियमित पावसासाठी 27 दिवस बाकी आहेत. त्यामुळे वाढणाऱ्या उष्णतेने पुढील काळात टंचाईग्रस्तांची वणवण आणखीनच वाढणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water scarcity in Sangmeshwar Taluka