चिपी विमानतळासाठी पाटमधून तात्पुरते पाणी - केसरकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

सिंधुदुर्गनगरी - चिपी विमानतळाला तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठ्यासाठी पाट तलावातून पाईपलाईनसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले.

सिंधुदुर्गनगरी - चिपी विमानतळाला तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठ्यासाठी पाट तलावातून पाईपलाईनसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले.

विमानतळ उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. चतुर्थीपुर्वी प्रकल्प पुर्ण करण्याचे आदेश याआधी नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले होते. चार दिवसापुर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली. यात चिपीच्या धावपट्टीवर 12 सप्टेंबरला विमान उतरणार असल्याचे नियोजन करण्याचे ठरले होते.

यानुसार नियोजनासाठीचे काम सुरू झाले आहे. याचाच भाग म्हणून आज आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आय. आर. बी. कंपनीचे वरीष्ठ आधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, लघुपाटबंधारे विभाग, वीज वितरण कंपनी आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. यात विमानतळ कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच.टी. जगताप उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या सुचना -  

  • चिपी विमानतळासाठी तात्पुरता पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी पाट तलावापासून लाईन टाकण्याचे संयुक्त सर्वेक्षण करावे,
  • सार्वजनिक बांधकाम विभागाने चिपी गावाकडे जाणारा रस्ता, परुळे गावातून विमानतळाकडे येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम आठ दिवसात सुरु करावे.
  • परुळे गाव ते विमानतळ बी.एस.एन.एल. केबल टाकण्याचे काम त्वरीत पूर्ण करावे.
  • वीज कंपनीने कायमस्वरुपी वीज पुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून आय. आर. बी. कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन कार्यवाही सुरु करावी,

चिपी विमानतळासाठी चिपी व परुळे ग्रामपंचायत हद्दीत जमिनींचे भूसंपादन झाले आहे. या दोन्ही गावातील ज्या कुटुंबांच्या जमिनींचे भूसंपादन झाले आहे, अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील इच्छुक व्यक्तींनी नोकरी मिळण्याबाबतचे अर्ज आपल्या शैक्षणिक अर्हतेसह व सोबत जमिनीचा सातबारा उतारा जोडून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये द्यावेत. पात्र व्यक्तींना नोकरी देण्याबाबत आय. आर. बी. कंपनीमार्फत कार्यवाही केली जाईल.
- दीपक केसरकर,
पालकमंत्री, सिंधुदुर्ग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water supply to Chipi Airport from Pat