काजू-आंबा बागेत खुलले कलिंगड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येथील प्रमोद परूळेकर यांच्या बागेत तयार झालेली कलिंगडे.

काजू-आंबा बागेत खुलले कलिंगड

देवगड - मेहनत आणि अभ्यासपूर्ण शेती केल्यास चांगले उत्पादन घेता येते. व्यावसायिक पध्दतीने शेती केल्यास अर्थार्जन चांगले मिळते, असा सर्रास अनुभव आहे. यातूनच फोंडा (ता. कणकवली) येथील प्रमोद परूळेकर या बागायतदाराने काजू आणि आंब्याच्या बागेत कलिंगड लागवड केली होती. सुमारे १४ किलो वजनाच्या विक्रमी आकारातील कलिंगडांचे उत्पादन त्यांनी घेतले. सुमारे दोन टन कलिंगडे फोंडा येथील स्थानिक बाजारात त्यांनी घाऊक पध्दतीने विकली. एकेकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे समीकरण होते; मात्र काळानुरूप शेती मागे पडून अनेक तरुणांनी मुंबईसह अन्य शहरांचा रस्ता धरला. त्यामुळे उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असे समीकरण पुढे आले. घरोघरी असणारी दुभती जनावरे मागे पडून पिशवीच्या दुधाच्या चहाने दिवसाची सुरुवात होऊ लागली.

बैलजोडीची जागा यांत्रिकीकरणाने घेतली. अनेकांनी परवडत नाही म्हणून शेती सोडून दिली. जमिनी ओस पडू लागल्या. काहींनी दुसऱ्यांकडे कसण्यासाठी जमिनी दिल्या, तर काहींनी शेतजमिनीच्या जागी फळफळावळ लागवड केली; मात्र आधुनिकतेच्या जमान्यात अधिक उत्पादन देणारी बियाणी वापरून योग्य मेहनत घेतल्यास शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळू शकते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. अलीकडे शेतीमध्ये व्यावसायिकपणा आला आहे. अधिक उत्पादन देणारे बियाणे वापरून भातशेती करून भात विक्री केली जात आहे. कणकवली तालुक्यातील फोंडा येथील श्री. परूळेकर यांनी मेहनतीतून कलिंगडाचे उत्तम उत्पादन घेतले. त्यांनी मागील पावसात आपल्या मोकळ्या जागेत आंबा, काजूची लागवड केली होती. यंदा त्याच झाडांच्या आळ्यावर कलिंगड बियांची पेरणी केली. त्यातून चांगली लागवड झाली. कोणतेही मार्गदर्शन, तांत्रिक ज्ञान नसतानाही केवळ सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून त्यांनी आणि पत्नी सौ. हेमा यांनी मेहनत केली. प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आली होती. यामध्ये व्यावसायिक धोरण मुळीच नव्हते. साधारणतः एका कलिंगडाचे वजन सात किलोपर्यंत असते; मात्र श्री. परूळेकर यांनी केलेल्या लागवडीतून त्यांना अधिकतम १४ किलो वजनापर्यंत उत्पादन मिळाले आहे. ७ ते १४ किलो वजनापर्यंत त्यांना कलिंगड उत्पादन मिळाले. कोणतेही रासायनिक खत न वापरता सेंद्रीय पध्दतीने उत्पादन घेतले गेले. सुमारे दोन टन कलिंगडे १३ रुपये प्रतिकिलोप्रमाणे त्यांनी फोंडा बाजारात घाऊक पध्दतीने विकली. अजूनही काही कलिंगडे शिल्लक असून, लवकरच ती काढली जातील. आता त्यांना कलिंगडातील अर्थार्जन कळले असून, पुढील वर्षापासून या क्षेत्रात व्यावसायिक पध्दतीने उतरण्याचा त्यांचा मानस आहे. शेतीमध्ये मेहनत करून उत्पादन घेता येते, हे यावरून सिध्द झाले आहे. सुमारे १४ किलो वजनाची कलिंगडे घेतल्याने त्यांच्या मेहनतीचे कौतुक होत आहे. स्वतःचे स्वतःच मार्गदर्शक बनून शेतीमध्ये नवी क्रांती त्यांनी घडविली. १४ किलो वजनाची कलिंगडे निघाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

मोकळ्या जागेत नव्याने केलेल्या आंबा, काजू झाडांच्या आळ्यांवर कलिंगड बियाणे पेरण्यात आले होते. सुमारे चारशे वेलातून आतापर्यंत दोन टन कलिंगड उत्पादन घेतले आहे. प्रायोगिक तत्वावर लागवड केली होती. सोशल मीडियावरील मार्गदर्शन अभ्यासून मशागत केली. सुमारे १४ किलोपर्यंत कलिंगडे धरली. तरुणांनी शहराकडे न धावता आपल्या शेतजमिनीवर विविध उत्पादने घेतल्यास फायदा आहे. शेतीमधून शाश्‍वत उत्पन्न मिळू शकते.

- प्रमोद परूळेकर, शेतकरी, फोंडा (कणकवली)

Web Title: Watermelon Bloomed In Cashew Mango Orchard At Devgad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top