राजापूर शहराला सलग दुसर्‍या दिवशी पूराचा वेढा; जनजीवन विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update heavy rain fall in rajapur Flood Arjuna-Kodavali rivers ratnagiri

राजापूर शहराला सलग दुसर्‍या दिवशी पूराचा वेढा; जनजीवन विस्कळीत

राजापूर : सततधारा पावसामुळे अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूराच्या पाण्याच्या वेढ्यातून सुमारे सात तासानंतर सुटका झालेल्या राजापूर शहराला आज दुपारी पुन्हा एकदा सलग दुसर्‍या दिवशी पूराचा वेढा पडला आहे. शिवाजीपथ रस्त्यासह वरचीपेठ, मुन्शी नाका परिसर पाण्याखाली गेला असून जवाहरचौकामध्ये सुमारे दिड-दोनफुट उंच पाणी वाढलेले होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने शहराभोवतीचा पूराचा वेढा सायंकाळी उशीरापर्यंत कायम राहीलेला होता. या पूरस्थितीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल रोडावली आहे. पाचल येथील अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटून लगतच्या भातशेतीमध्ये मोठ्याप्रमाणात मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यातून, भातशेतीध्ये मातीच्या गाळाचा तर निर्माण झाला आहे.

कृषी विभाग आणि महसूल विभागाने केलेले सर्व्हेक्षण आणि पंचनाम्यामध्ये सुमारे 2.5 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, संभाव्य दरडींचा आणि पूराचा धोका ओळखून धोपेश्‍वर येथील 120 तर, जवळेथर येथील नऊ अशा 129 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचा नोटीसा बजावण्यात आल्याची माहीती महसूल विभागाकडून देण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यामध्ये सततधारा पाऊस पडत आहे. यामध्ये शहरातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नद्यांना काल दुपारी पूर येवून पूराचे पाणी शहरामध्ये घुसले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने रात्री उशीरा सुमारे सात तासाच्या कालावधीनंतर जवाहरचौकातील पूराचे पाणी ओसरले होते. त्यामुळे काल विस्कळीत झालेले जनजीवन आज पूर्वपदावर आले होते. मात्र, सकाळी पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने दुपारी पुन्हा एकदा नद्यांच्या पूराच्या पाण्याने शहराला वेढा घातला. त्यामध्ये पूराच्या वाढलेल्या पाण्याने जवाहरचौकामध्ये थेट धडक देत सायंकाळी उशीरापर्यंत त्या ठिकाणी ठिय्या मांडला होता. त्यानंतरही पावसाचा जोर कायम असल्याने पूराचे पाणी तासागणिक वाढत चालले होते.

सलग दुसर्‍या दिवशी आलेल्या पूराच्या पाण्याखाली शहरातील बहुतांश भाग गेला होता. त्यामध्ये जवाहरचौक, वरचीपेठ, मुन्शी नाका, बंदरधक्का परिसर, शिवाजी पथ रस्ता आदीचा समावेश आहे. जवाहरचौकातील टपर्‍यांसह शिवाजी पथ रस्त्यावरील टपर्‍यांमध्ये पूराचे पाणी घुसल्याने दुपारपासून या टपर्‍या बंदावस्थेमद्ये होत्या. शहराप्रमाणे ग्रामीण भागही पूराच्या अधिपत्याखाली राहीला आहे. त्यामध्ये नद्यांच्या काठावरील भातशेतीसह रस्ते पूराच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सातत्याने राहीलेल्या या पूरस्थितीमुळे शहरातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. तर, पूरस्थितीमुळे लोकांची वर्दळ ठप्प झालेल्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल सलग दुसर्‍या दिवशी रोडावली आहे. शहरानजीकच्या शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्ता गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पूराच्या पाण्याखाली राहीला आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना सुमारे दहा-बारा कि.मी. चा वळसा मारून घर गाठावे लागत आहे.

Web Title: Weather Update Heavy Rain Fall In Rajapur Flood Arjuna Kodavali Rivers Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..