
पावसामुळे तारांबळ; पूर्व मोसमीचा तडाखा; रेल्वे प्रवाशांचे हाल; रस्त्यावर पाणी
कणकवली : पूर्व मोसमी पावसाने झोडपून काढल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आज कोलमंडले. मुंबईकडून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या एक ते दोन तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागत होते. कणकवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावल्याने आज जागोजागी पाणी साचले होते. या पावसाचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. कणकवली रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढत प्रवाशांना पुढे सरकत जावं लागत होते. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर काही भागांमध्ये पत्र्याची शेड आहे. यातूनही गळती असल्यामुळे प्रवाशांना उभे राहावे लागत होते.
दोन-तीन वर्षांपासून प्लॅटफॉर्म एकवर छप्पर गळती आहे. ही परिस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. उन्हाळी हंगाम संपून गेला तरी रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रवाशांना आज गळती लागलेल्या फलाटावर बसावे लागले होते. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. फलाट क्रमांक दोनवर आज दादर ते सावंतवाडीकडे जाणारी रेल्वे दाखल झाली. याचवेळी पाऊस सुरू होता. त्यामुळे प्रवाशांना भिजत गाडीत चढावे लागले.
Web Title: Weather Update Rain In Kankavli Monsoon Affect Railway Passengers Water On Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..