
देवगड तालुक्यात हापूस काढणीची धांदल
देवगड : हवामान बदल, वाढते तापमान आणि अवकाळी पावसाची शक्यता यामुळे आता आंबा काढणीला वेग आला आहे. उष्णतेमुळे झाडावरील फळे झटपट तयार होत असल्याने बागायतदारांची धावपळ दिसत आहे. झाडावरील आंबा काढून त्याची प्रतवारी करून फळबाजारात तसेच खासगी ग्राहकांना आंबा विकण्याची धांदल सुरू आहे. दरम्यान, रात्रीपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली होती.
तालुक्यात कालपर्यंत मॉन्सूनपर्व पाऊस झालेला नव्हता. अलीकडे उकाड्यात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे झाडावरील फळे लवकर तयार होऊ लागली आहेत. अखेरच्या टप्यात काही बागायतदारांकडे आंबा शिल्लक आहे. काढलेला आंबा वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवून त्याचे पॅकिंगचे काम सुरू आहे. आता मान्सून तोंडावर आल्याने हवामान बदलामुळे जोराचा अवकाळी पाऊस झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. फळमाशीमुळे बागायतदार हैराण आहेत. त्यामुळे आंबा फळे तपासून पॅकिंग केली जात आहेत. काही बागायतदारांचा आंबा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे उरलासुरला आंबा काढून त्याचे व्यवस्थापन सुरू आहे.
बागायतदारांची धावपळ
अखेरच्या टप्प्यात काही बागायतदारांकडे भरपूर आंबा शिल्लक आहे. अजूनही आठ दिवस आंबा उतरवण्यासाठी अपेक्षित होते. मात्र, माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बागायतदार धावपळीत दिसत होते.
Web Title: Weather Update Rising Temperatures And Possibility Of Unseasonal Rains Mango Harvesting In Devgad Taluka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..