esakal | लाॅकडाउनमुळे अनेकांनी विकेंडसाठी गाठला गोवा

बोलून बातमी शोधा

weekend lockdown konkan sindhudurg

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासनाने सोमवार ते शुक्रवार मिनी लॉकडाउन तर शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 या 59 तासांत कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. जिल्ह्यात या लॉकडाउनला सुरुवातीला विरोध झाला होता. विशेषता व्यापारी संघाने जोरदार विरोध दर्शविला होता.

लाॅकडाउनमुळे अनेकांनी विकेंडसाठी गाठला गोवा
sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - 100 टक्के लॉकडाउनला जिल्ह्यातील नागरिकांचा तीव्र विरोध असला तरी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाउनला जनतेने 100 टक्के प्रतिसाद दिला. लॉकडाउनच्या आजच्या पहिल्याच दिवशी घरात राहत नागरिकांनी "आपली जबाबदारी' पार पाडली. यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्ते सुनेसुने झाले होते. तर बाजारपेठांसह जिल्ह्यातील शहरात शुकशुकाट पसरला होता. दरम्यान, महाराष्ट्रात लाॅकडाउन असल्याने अनेकांनी विकेंडसाठी गोव्याची वाट धरली आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासनाने सोमवार ते शुक्रवार मिनी लॉकडाउन तर शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 या 59 तासांत कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. जिल्ह्यात या लॉकडाउनला सुरुवातीला विरोध झाला होता. विशेषता व्यापारी संघाने जोरदार विरोध दर्शविला होता. त्यामुळे विकेंड लॉकडाउन जिल्ह्यात यशस्वी होईल की नाही? याबाबत प्रश्‍न होता. गुढीपाडवा हा सण तोंडावर आला आहे. हा दिवस शुभ मानला जातो. यानिमित्त नवीन खरेदी, नव्या व्यवसायाची सुरुवात केली जाते. त्यामुळे हा विरोध तीव्र होता. पालकमंत्री उदय सामंत यानी वारंवार आवाहन करीत हा आठवडा नियम पाळा. नंतर यातून सवलत देण्यासाठी प्रयत्न करतो. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शासन आदेश पाळा, असे आवाहन केले होते. 

शुक्रवारी रात्री 8 वाजता लॉकडाउन सुरु झाले तरी शनिवारी दिवसभरात नागरिकांची काय भूमिका राहते? याकडे लक्ष होते; परंतु नागरिकांनी शासनाच्या आवाहनाला 100 टक्के प्रतिसाद दिला. केवळ वैद्यकीय सारखी अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद ठेवल्या होत्या. तसेच नागरिकही घराबाहेर पडले नाहीत. जिल्ह्यात कुठेही पोलिसांना बळाचा वापर करून बाजारपेठ किंवा दुकाने बंद करावी लागली नाहीत. शुक्रवारी रात्री शिरोडा सारख्या काही भागात नियम मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई झाल्याने शनिवारी तसा प्रकार घडलेला नाही. 

अनेकांनी गाठले गोवा 
जिल्ह्यात दोन दिवस बाहेर पडता येणार नसल्याने जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी गोवा पर्याय निवडला आहे. महाराष्ट्रात लॉकडाउन असले तरी नजिकच्या गोवा या पर्यटन राज्यात लॉकडाउन नाही. त्यामुळे अनेकांनी घरी राहण्यापेक्षा गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला. कुटुंब किंवा ग्रुपने काल (ता.9) सायंकाळी किंवा आज सकाळी लोकांनी गोवा गाठले आहे. 

चाकरमानी संख्या वाढली 
मिनी लॉकडाऊन, विकेंड लॉकडाऊन व तीन आठवड्याचे लॉकडाऊन लागण्याची होत असलेली चर्चा तसेच महाराष्ट्र शासनाने पहिली ते नववी व अकरावीच्या रद्द केलेल्या परीक्षा यामुळे कामनिमित्त मुंबई, पुणे सारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने गावाकडची वाट धरली आहे. आज सकाळपासून मोठ्या संख्येने नागरिक जिल्ह्यात दाखल होवू लागले आहेत. 

संपादन - राहुल पाटील