पाण्यातून निघाले वळवळणारे किडे; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

पिराचा माळ (ता. सुधागड) येथील रहिवासी बल्लेश सावंत यांच्या घरातील नळातून चक्क वळवळणारे मोठे किडे नुकतेच बाहेर आल्याची घटना घडली.

पाली : पिराचा माळ (ता. सुधागड) येथील रहिवासी बल्लेश सावंत यांच्या घरातील नळातून चक्क वळवळणारे मोठे किडे नुकतेच बाहेर आल्याची घटना घडली. या आधी नळातून अनेक वेळा जिवंत साप देखील आले आहेत. त्यामुळे पालीमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. त्यामुळे नळातून दूषित पाण्याबरोबरच साप, किडे, शंख, शिंपले शेवाळ व गाळ कायम येत असतात. सावंत यांच्या नळातून आलेले किडे हे कदाचित खुबे किंवा शंखाचे पिल्ले असू शकतात असे ग्रामपंचायत सदस्य अमित निंबाळकर यांनी सकाळला सांगितले. 

पावसाळ्यानंतर अंबा नदीचे पाणी बंधारा कार्यान्वित करून अंबा नदीचे पाणी अडविले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदुषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदीवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखिल पाणी खराब होते. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे. या प्रदुषणामुळे पाण्याचा रंग पूर्णपणे गडद हिरवा व निळसर झाला आहे. पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. समग्र पालीकर पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी अंबा नदीच्या पाण्याचा वापर करतात. हे पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही नागरिकांना अधिकचे पैसे खर्च करुन पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घ्यावा लागतो. 

पाण्याची साठवण टाकी साफ करून घेतल्यानंतरही पाण्याच्या नळातून वळवळणारे किडे आल्याने आणि दोन दिवसांनंतर सलग दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने सावंत कुटुंबीय धास्तावले आहेत.  

शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

पालीकरांना गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. पालीतील शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना मागील १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. योजनेसाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखिल आजतायागत ही योजना कार्यान्विय झालेली नाही. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

शुद्ध नळपाणी योजनेचे झाले काय ?

महाराष्ट्र शासनाने केलेल्या 2008 -09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखाचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती, परंतू राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली गेली. त्याबरोबर १० टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखिल होता. मात्र पालीला ‘’ब’’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी ११ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. मात्र आजतागायत ही योजना कार्यान्वित करण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. 

तात्पुरती फिल्टर योजना कुचकामी

नुकतेच अंबा नदीच्या जॅकवेल जवळ १५ लाख रुपयांच्या एका फिल्टर योजनेअंतर्गत फिल्टर बसविण्यात आले होते. मात्र पाणी साठवण टाक्यांपर्यंत नेणारे पाईप अरुंद असल्यामुळे व काही तांत्रिक कारणांमुळे हे फिल्टर काढून साठवण टाक्यांजवळ नेण्यात आले आहेत, मात्र अजूनही फिल्टर बसविण्याचे व कार्यान्वित करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. ज्या ठेकेदाराकडे या कामाची जबाबदारी दिली आहे, तो देखील याकडे दुर्लक्ष करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A weird creature found in drinking water in Pali