कामथे घाटात "व्हाइट कॉलर' लूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

चिपळूण - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात महामार्ग पोलिसांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली लूटमार सुरू आहे. या "व्हाइट कॉलर' लुटीमुळे तक्रार करावी तरी कुणाकडे, या विवंचनेत वाहनचालक सापडले आहेत. 

चिपळूण - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात महामार्ग पोलिसांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली लूटमार सुरू आहे. या "व्हाइट कॉलर' लुटीमुळे तक्रार करावी तरी कुणाकडे, या विवंचनेत वाहनचालक सापडले आहेत. 

महामार्गावर वाहनधारकांना अडवणारे वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी म्हणजे सरकारच्या आणि संबंधित विभागाच्या अलिखित परवानगीने चालणारे "चालते बोलते' टोलनाके असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, वाहनचालकांना मार्गदर्शन करणे, क्षमतेपेक्षा अधिक किंवा विनापरवाना मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे, अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, नाकाबंदीची कर्तव्ये बजावणे, अपघातस्थळी वाहनधारकांना मदत करणे ही कामे महामार्गावरील वाहतूक पोलिसांकडून अपेक्षित आहेत. मात्र त्यांच्याकडून केवळ वाहने अडवून, सक्तीने पैसे वसूल करण्याचा उद्योग कामथे घाटात राजरोस सुरू असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला. हा सर्व प्रकार जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असून ते याकडे कानाडोळ करत असल्याचे दिसते. 

कामथे घाटातील अवघड वळणावर वाहतूक पोलिस वाहनासह आढळून येतात. वाहनात त्यांचा म्होरक्‍या बसून असतो. सहकारी वाहनांना अडविण्याचे काम करतात. वाहने अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते. वाहनधारकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही काहीतरी उणीव शोधून अवास्तव दंडाच्या रकमेची मागणी केली जाते व ती न दिल्यास तडजोड करून सुवर्णमध्य साधला जातो.

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे या महामार्गावरून प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. नागरी समस्या कायम असताना पोलिसांचे "टार्गेट' मात्र चांगलेच फॉर्मात आहे. वरिष्ठांनी यात लक्ष घालून ही एक प्रकारची वाटमारी थांबवण्याची गरज आहे. मात्र संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या मार्गावरून जाणार असल्यास त्याची कल्पना आधीच मिळालेली असते, त्यामुळे तेवढा वेळ ही मंडळी निभावून नेतात. 

गाडीमागे 200 रुपये ? 
चिपळुणातील अनिल सुर्वे यांचे 8 ट्रक चिपळूण- रत्नागिरी मार्गावर धावतात. काल (ता.16 ) सकाळी 11 वाजता त्यांची गाडी थांबवण्यात आली. एका ट्रकमागे 200 रुपये द्या म्हणजे आम्ही गाडी अडविणार नाही, अशी मागणी कामथे घाटातील एकाने केली. आपण वाहतूक पोलिस असल्याचे त्याने सांगितल्याचे सुर्वे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: White collar robbery in Kamathe Ghat