उत्पन्न कमी असूनही काजूचे मार्केट का कोसळले ? 

Why Cashew Nut Market Collapse Despite Lower Yields
Why Cashew Nut Market Collapse Despite Lower Yields

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात विक्रीसाठी काजू बिया दाखल होऊ लागल्या तरी यंदा दर सुरूवातीपासून पडलेलाच आहे. यंदा काजूचे उत्पन्न कमी असूनही मार्केट कोसळत आहे. यामुळे बागायतदार अडचणीत आहेत. 

वातावरणाच्या फटक्‍यामुळे आर्थिक समस्यांच्या गर्तेत सापडलेला काजू जीआय मानांकन आणि हमी भावापासून दूर राहिला आहे. त्याला कोणाचाच आधार नसल्याची स्थिती आहे. यंदा थंडीचा हंगाम पुढे गेला तसेच क्‍यार वादळामुळे आंबा व काजूला मोहर आल्यावर पुन्हा पालवी फुटली. याचा आंबा - काजू पिकावर परिणाम होऊन ही दोन्ही पिके योग्य वातावरण न मिळाल्याने दीड ते दोन महिन्यांनी उशिराने आली. 

यंदा काजू पीक हे 40 टक्‍केच्या खाली हाती येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता; मात्र त्याच्या दराबाबत ही मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. बऱ्याच ठिकाणी चांगली थंडी मिळालेले काजू पीक हे शेतकऱ्यांच्या हाती येऊ लागले आहे; मात्र त्यालाही योग्य दर नसल्याने बागायतदारात मात्र मोठी नाराजी आहे. 

गतवर्षी काजू पिकाला सुरुवातीलाच 170 ते 160 पर्यंत दर राहिला होता. गतवर्षी आवक कमी असतानाही हा दर बराच काळ स्थिर राहिला होता; मात्र यंदाची स्थिती खूप दयनीय आहे. कलमी काजू बागायतदारांचे अलीकडे जिल्ह्यात प्रमाण वाढले आहे. पूर्वी मजुरांना 80 ते 100 रूपये मजूरी होती ती आता पाचशेवर गेली आहे. त्यातच कीटकनाशके, खते तणनाशके यांचा दरही वर्षानुवर्षे वाढत गेला. एकीकडे काजू कलमासाठी खर्च वाढत गेला तरी दुसरीकडे काजूचा दर मात्र तेवढाच किंवा कमीच राहिला. काजूच्या हमीभावाबद्दलही प्रश्‍नचिन्ह असल्याने काजू बागायतदारांमध्ये मात्र मोठी नाराजी आहे. 

दुसरीकडे आयात शुल्कामध्ये सूट मिळाल्याने परदेशातून मोठ्या प्रमाणात काजू बी विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. यंदा कोकणातील काजूचे प्रमाण घटल्याने परदेशी काजूची आयात मोठ्या प्रमाणात होणार आहे. जिल्ह्यातील काजूची जीआय मानांकनची प्रक्रिया एकीकडे रखडली गेली. त्यामुळे काजू खवय्यांना येथील काजूच्या नावाने परदेशी काजू घेण्याची वेळ येणार आहे. म्हणजेच स्थानिक काजूत परदेशी काजूची ही भेसळ वाढणार आहे.

राज्यात सुदान, घाना, तांझानिया, व्हिएतनाम, आफ्रिका येथील काजूची आयातही वाढणार आहे. कारण बाजारपेठेत सुरुवातीलाच दाखल झालेला किरकोळ काजू हा 155 ते 150 एवढा दराने खरेदी केला जात होता तर अवघ्या एका आठवड्यातच आता दर 130-125 तर काही ठिकाणी 120 रुपयांनी प्रतिकिलोने झाला आहे. यामुळे काजू बागायतदार मोठ्या संकटात आले असून शिल्लक असलेल्या पिकानेही चांगले उत्पन्न हाती येणार नसल्याचे दिसून येत आहे. 

सिंधुदुर्गातील काजूची वेगळी ओळख दुर्लक्षित 
जिल्ह्यात सावंतवाडी, बांदा आणि दोडामार्गमधील काजूला एक विशिष्ट चव असते. त्याचे टरफलही पातळ आणि आतला गर मोठा असतो. जसा जिल्ह्यात देवगड हापूसला विशेष आणि ओळख आहे. असे असतानाही सिंधुदुर्गातील काजूला अद्यापही जीआय मानांकन मिळाले नाही. याची प्रक्रिया सुरू होती; मात्र ती रखडली गेली. 

हमीभावाची गरज 
कमी उत्पन्न आल्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो; मात्र काजूला हमीभाव मिळण्यासाठी फारसे यशस्वी प्रयत्न अद्यापही झाले नाहीत. प्रयत्न झाले तरी प्रयत्न करणारे गट वेगवेगळे असल्याने त्याचा फायदा होऊ शकला नाही. यासाठी खरेदी विक्री संघ, पणन महामंडळ व लोकप्रतिनिधी यांनी एकाच छताखाली येणे गरजेचे आहे, तरच बागायतदारांची हमीभावाची समस्या दूर होऊ शकते. 

"" वातावरणीय बदलांचा फटका काजूला बसतो. यावर्षी काजूचे बऱ्यापैकी उत्पन्न घटले आहे. काजू कलमांना कीडरोग नियंत्रण व्यवस्थापन तसेच मजूर आदी गोष्टीमुळे तोटा जास्त फायदा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गातील काजूची चव आणि ओळख वेगळी असूनही हा काजू हमीभावाच्या आणि जीआय मानांकनच्या प्रतीक्षेत आहे. ही समस्या शासन स्तरावर सोडविणे गरजेचे आहे.'' 
- संजय देसाई, काजू बागायतदार, डेगवे 

कृषी अर्थकारणच अडचणीत 
वैभववाडी
-  जिल्ह्यातील काजू उत्पादनात प्रचंड घट होत असताना दुसरीकडे काजूचे दर 10 रूपयांनी घसरले आहेत. बाराशे ते पंधराशे कोटीची उलाढाल असलेल्या काजू व्यवसाय नाजूक स्थितीत सापडल्यामुळे जिल्ह्याचे अर्थकारण कोलमडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यातील 67 हजार एकर क्षेत्र काजू लागवडीखाली आहे. यातील 49 हजार एकर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. निव्वळ काजू व्यवसायातून बाराशे ते पंधराशे कोटीची उलाढाल होते; परंतु यावर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानतंर नोव्हेंबरमध्ये आलेल्या क्‍यार वादळामुळे पाऊस लांबला. ऑक्‍टोंबरमध्ये काजूला येणारी पालवी डिसेंबरच्या अखेरीपर्यंत आलेली नाही. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या काजू बागा उध्वस्त झाल्या. त्यानतंर काही शेतकऱ्यांनी अथक प्रयत्न केले; परंतु सततच्या ढगाळ वातावरणाचा परिणाम काजूवर झाला. डिसेंबरमध्ये किरकोळ बागांनाच मोहोर आला. त्यामुळे सध्या बाजारात 4 ते 5 शेतकऱ्यांच्या काजू उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात काजूला प्रतिकिलो 140 रूपये दर मिळत होता; परंतु या आठवड्यात दरामध्ये 10 रूपयांची घसरण होऊन हा आता हा दर 130 रूपयावर आला आहे. 
एकीकडे काजू उत्पादन मोठी घट होणार हे निश्‍चित आहे. सरासरी 20 ते 25 टक्केच काजू उत्पादन होईल, अशी शक्‍यता आहे. ज्यावेळी एखादे उत्पादन कमी होते, त्यावेळी त्या उत्पादनाचा दर वाढतो, असे सर्वसाधारण समीकरण असते; परंतु परदेशातून येणाऱ्या काजूवरील आयात शुल्क 5 टक्केवरून अडीच टक्के केल्यामुळे तो काजू येथील काजूपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना उपलब्ध होतो. त्यामुळे स्थानिक काजूच्या उत्पादनाचा कोणताही परिणाम दरांवर होत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. 

काजू उत्पादनातील घट आणि दरातील घट यामुळे जिल्ह्याचे अर्थकारण कोलमडण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजुचे क्षेत्र असून जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अवलंबत्व काजूवर आहे. काजू व्यवसाय नाजुक स्थितीत सापडल्यामुळे काजू बागायतदारांमधील चिंता वाढली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com