पतीच्या खून प्रकरणात पत्नी, मित्राचा जामिन फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

पतीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेली पत्नी व तिचा मित्र यांचा 45 दिवसांचा अंतरिम जामीन जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी फेटाळून लावला आहे.

ओरोस ( सिंधुदुर्ग) - पतीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेली पत्नी व तिचा मित्र यांचा 45 दिवसांचा अंतरिम जामीन जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अजित उर्फ श्रीकृष्ण भणगे आणि सहाय्यक सरकारी वकील मिहिर भणगे यांनी काम पाहिले. 

जयश्री गुरव हिचे सुरेश चोथे याच्याशी अनैतिक संबंध होते. यावरून जयश्री व तिचा पती मृत विजयकुमार गुरव यांच्यात भांडणे होत होती. 6 नोव्हेंबर 2017 ला रात्री नवरा दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेत जयश्री हिने साथीदार सुरेश याच्या मदतीने तोंडावर उशी दाबली. त्यानंतर डोक्‍यावर लोखंडी रॉड मारून त्याला ठार मारण्यात आले. त्यानंतर रक्त गळू नये यासाठी मृताच्या डोक्‍याला प्लास्टिक पिशवी बांधण्यात आली. 
पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या वस्तूसह मृतदेह ओमनी गाडीतुन आंबोली गेळे येथील दरीत फेकला होता. आरोपीने स्वतःची रक्ताने माखलेली पॅन्ट व मृताचे पैशाचे पाकीट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी विजयकुमार गुरव बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. तर मृतदेह मिळाल्यानंतर दोघेही संशयित फरार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना या प्रकरणी अटक केली होती. सद्यस्थितीत दोन्ही संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. 

दरम्यान कोविड 19 च्या पाश्वभूमीवर 45 दिवसांच्या अंतरिम जामिनासाठी त्यांनी न्यायालयाकडे विनंती अर्ज सादर केला होता. यावरील सुनावणीत या प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 साक्षीदाराचे जबाब नोंदविण्यात आल्या आहेत. परिस्थितीजन्य पुरावयाच्या आधारे हा खटला चालत असून संशयिताना जामिन दिल्यास त्यांच्याकडुन साक्षीदारावर दबाव येण्याची शक्‍यता सरकार पक्षाने न्यायलयाच्या निदर्शनास आणून दिली होती. जयश्री हिचा जामीन उच्च न्यायालयानेही फेटाळला होता. त्यामुळे जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती असे वकील अजित भणगे यानी स्पष्ट केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife Bail Rejected In Husband Murder Case Sindhudurg Marathi News