पत्नीसह मित्राकडून प्राणघातक हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

कणकवली - तालुक्‍यातील फोंडाघाट नाथ पै नगर येथे पतीवर पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीने चाकूने वार केले. यात पती जखमी झाला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमी पतीचे नाव गणेश बापू कुबडे (वय 38) असे आहे. तर चाकूने वार करणाऱ्या पत्नीचे नाव अंजली कुबडे (वय 37) असे आहे.

कणकवली - तालुक्‍यातील फोंडाघाट नाथ पै नगर येथे पतीवर पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीने चाकूने वार केले. यात पती जखमी झाला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमी पतीचे नाव गणेश बापू कुबडे (वय 38) असे आहे. तर चाकूने वार करणाऱ्या पत्नीचे नाव अंजली कुबडे (वय 37) असे आहे.

गणेश याच्या हातावर, पाठीवर 11 वार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अंजली अणि तिचा मित्र गणेश गायकवाड (दोन्ही रा. फोंडाघाट) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

फोंडाघाट नाथ पै नगर येथील गणेश कुबडे यांची पत्नी अंजली कुबडे ही गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या काकाकडे राहत होती. पत्नीला घरी आणण्यासाठी गणेश कुबडे आज (ता. 28) सकाळी सहाच्या सुमारास गेले असता पत्नी अंजली आणि तिचा मित्र गणेश गायकवाड यांनी भांडण केले. 

गणेश याने आपली पत्नी अंजली हिला आपली मुले सावंतवाडी येथील अंकुर बालसुधारगृहात आहेत. त्यांना परत आणूयात असे सांगितले. या वेळी अंजली हिने मी येणार नाही असे ठणकावले. या वेळी तेथे आलेल्या गणेश गायकवाड यालाही गणेश याने सुनावले. आमच्या पती-पत्नीच्या चर्चेत तुझा संबंध नाही. तू इथून चालता हो असे सांगितले. यावेळी गणेश गायकवाड हा घरातील कुऱ्हाड घेऊन आला. तर गणेश कुबडे याने तेथून पळ काढला. 

अंजली हिच्या घराकडून पळालेल्या गणेश कुबडे हा फोंडाघाट गांधी चौक येथे आला असता त्याची पत्नी अंजली आणि तिचा मित्र गणेश गायकवाड हे तेथे दुचाकीवरून आले. यावेळी त्यांनी गणेश कुबडेच्या पाठीवर लाथ घालून खाली पाडले. त्यावेळी गणेश गायकवाड आणि गणेश कुबडे यांच्यातील भांडण सुरू असताना पत्नी अंजली हिने पतीच्या हातावर, पाठीवर चाकूने 11 वार केले. या वेळी तेथे आलेले ग्रामस्थ सुभाष वेंगुर्लेकर यांनी भांडण सोडविले आणि जखमी गणेश कुबडे याला उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दाखल केले. 

उपचार घेतल्यानंतर सायंकाळी पती गणेश कुबडे याने पत्नी अंजली आणि तिचा मित्र गणेश गायकवाड यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिस या दोहोंचा शोध घेत आहेत. 

गणेश कुबडे आणि अंजली यांच्या विवाहाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुलगे आणि आठ महिन्यांची एक मुलगी आहे. ही तीनही मुले सावंतवाडी येथील अंकुर बालसुधारगृहात आहेत. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife with friend attack on Husband crime report