
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने मास्क बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी यांनीही मास्क वापर सक्तीचा केला आहे.
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना खुद्द नगराध्यक्ष संजू परब आणि आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर यांनी दणका दिला असून पालिका प्रशासन कर्मचारी व पोलिस प्रशासनाला घेऊन रस्त्यावर उतरत कारवाईचा बडगा उगारला. मास्क वापरा, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने मास्क बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी यांनीही मास्क वापर सक्तीचा केला आहे. त्यामुळे शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर पालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांपासून ही मोहीम हाती घेतली असताना ही शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या आजही भरपूर आहे.
शासन पातळीवरून कोरोना रुग्णांची पुन्हा वाढती संख्या लक्षात घेता खबरदारी म्हणून काही निर्णय घेण्याची शक्यता आहे तर विविध पातळीवर बंधने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे बनल्याने मास्क वापरावर पुन्हा एकदा शासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात येत आहे. राज्यात कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींनाही पुन्हा एकदा कोरोना झाल्याने भीती निर्माण होत आहे त्यामुळे खबरदारी म्हणून शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत.
...तर प्रत्येकाची जबाबदारी
शहरामध्ये मास्क वापरण्याबाबत पोलिसांकडून सक्ती केली जात असतानाही आज शहरात विना मास्क फिरणाऱ्यांना नगराध्यक्ष परब तसेच आरोग्य सभापती आडिवरेकर यांनी फटकारले. आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. प्रत्येकाने मास्क वापरा ही जबाबदारी सांगिक असून कोरोनाला पुन्हा एकदा डोके वर काढू देऊ नका, असे आवाहनही दोघांनी यावेळी केले.
संपादन - राहुल पाटील