श्वान महिलेभोवती घुटमळा अन् फिर्यादी महिलाच निघाली चोर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

घरातील मंडळींनादेखील याबाबत विश्वासात घेत पोलिसांनी या महिलेला विचारणा केल्यानंतर घाबरलेल्या या महिलेने आपणच चोरी केल्याची कबुली घरच्यांच्यासमोरच पोलिसांना दिली.

राजापूर : तालुक्‍यातील पाचल मुस्लिमवाडी येथील दिवसाढवळ्या झालेल्या चोरी प्रकरणात फिर्यादी असलेल्या अफसाना ताजुद्दीन टिवले (२५) हीच महिला चोर असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. पैशासाठी हा चोरीचा बनाव केल्याची कबुली या महिलेने पोलिसांना दिली. यातील चोरीला गेलेला ६८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमालही या तिने पोलिसांकडे सुपूर्द केला. पोलिस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या २४ तासात या चोरीचा छडा लावला आहे.

पाचल मुस्लिमवाडी येथील अफसाना ताजुद्दीन टिवले यांनी बुधवारी (१८) सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम अशा सुमारे १ लाख ७९ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची फिर्याद राजापूर पोलिसांत दिली होती. तपासासाठी पोलिसांनी रत्नागिरीतून श्वानपथकाला पाचारण केले होते. श्वानपथकाचे प्रमुख भूषण राणे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान घरातच या फिर्यादी महिलेभोवती घुटमळत होता.

हेही वाचा - ....आणि मामाचे गावही गहिवरले! -

पोलिसांना या फिर्यादी महिलेबाबतच शंका आली. घरातील मंडळींनादेखील याबाबत विश्वासात घेत पोलिसांनी या महिलेला विचारणा केल्यानंतर घाबरलेल्या या महिलेने आपणच चोरी केल्याची कबुली घरच्यांच्यासमोरच पोलिसांना दिली. दीराच्या कपाटातील रोख रक्कम व दागिने आपण चोरल्याचे सांगितले; मात्र त्यांच्याच कपाटातील दागिने व रोख रकमेची चोरी झाली, याबाबत शंका येऊ नये, म्हणून आपलेही दागिने आणि पैसे चोरीला गेल्याचा बनाव केला. महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली असून तिला गुरुवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

कार्यपद्धतीची चुणूक दाखविली

रायपाटण दूरक्षेत्राचा पदभार पोलिस हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर यांच्याकडे दिला आहे. तळेकर यांनी चोरीचा २४ तासाच्या आत तपास लावत कार्यपद्धतीची चुणूक दाखविली आहे. राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेकर यांसह पोलिस कर्मचारी अनंत तिवरेकर, भिम कुळी, किरण सकपाळ यांनी ही विशेष कामगिरी केली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the woman thief arrested by a police who was prosecution in ratnagiri with the help of dog found her theft