Video :सीटबेल्ट ठरला तिच्यासाठी जीवघेणा ;पेटत्या मोटारीतील थरार.....

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 19 मार्च 2020

गाडीत असलेल्या विवाहीतेने सिटबेल्ट लावला होता. यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. चालकाने गाडीतून बाहेर उडी घेतली; मात्र

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : चालत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने महिलेचा जळून जागीच मृत्यू झाल्याचा व पती गंभीररीत्या भाजल्याचा धक्कादायक भीषण प्रकार आंबोली घाटात घडला. यातील पतीची प्रकृती गंभीर आहे. 

ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ घडली. विवाहितेने सीटबेल्ट लावला असल्याने तिला बाहेर पडता आले नाही. संबंधीत बेळगावमधील पिरनकरवाडी येथील असल्याचे समजते.

हेही वाचा- ब्रेकिंग - कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

याबाबत उपलब्ध माहिती अशी

हे दाम्पत्य आज सायंकाळी मोटारीतून (जीए ०७ -७८०५) आंबोलीमार्गे गोव्याकडे जात होते. त्यांच्या गाडीत पुढे पत्नी होती. आंबोली चेकपोस्टवरून ही गाडी सहा वाजून वीस मिनिटांनी घाटाकडे निघाली. आंबोली धबधब्यापासून पुढे साधारण अडीच किलोमीटरवर गाडी आली असता पुढच्या बाजूने इंजिनने पेट घेतला. घटनास्थळावरील स्थिती पाहता चालकाने अचानक आग लागल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. ही गाडी रस्त्याच्या बाजूला आदळत गटारात कलंडली.

हेही वाचा- आता आमदार निकम करणार मधु दंडवते यांचे ते स्वप्न पूर्ण..

चालकाने आरडाओरड  केला मात्र
गाडीत असलेल्या विवाहीतेने सिटबेल्ट लावला होता. यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. चालकाने गाडीतून बाहेर उडी घेतली; मात्र ते गंभीररित्या भाजले. आगीचा भडका उडाल्याने विवाहीता आतच अडकली व गंभीररित्या भाजल्याने जागीच मृत्यु झाला.
चालकाने आरडाओरड सुरू केला. याच दरम्यान घाटातून जाणारी वाहने थांबवण्यात आली. जवळपास पाणी नसल्याने मदत कार्यालाही मर्यादा आली. आंबोली पोलिस दुरक्षेत्राला कळवण्यात आले. काही वेळात पाणी उपलब्ध करून आग विझवण्याचा प्रयत्न झाला; मात्र विवाहीतेला वाचवण्यात यश आले नाही.

दरम्यान उपलब्ध माहितीनुसार

संबंधीत दांम्पत्य हे १६ मार्चला आंबोलीमध्ये राहण्यासाठी आले होते. तेथील एका हॉटेलमध्ये ते थांबले. त्या ठिकाणी मिळालेल्या आयडी प्रुफवरून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या ओळखपत्रावरून संबंधीत ४४ वर्षाचे असून ते बेळगावमधल्या पिरणवाडी भागातील आहे. या दुर्घटनेमुळे जखमीला धक्‍का बसला. ते काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे पत्नीचे व त्यांचे नाव समजू शकले नाही. रूग्णवाहिकेतून जखमीला सावंतवाडीत नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बांबुळी येथे हलवण्यात आले. मृतदेहही सावंतवाडीत आणण्यात आला. 
घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अमित गोते आंबोली पोलिस दुरक्षेत्रचे गुरुदास तेली, आत्माराम तेली आदींनी धाव घेत स्थिती हाताळली. 

 अंदाज : सीटबेल्ट लावल्यामुळे बाहेर पडता आले नाही
महिलेने सीटबेल्ट लावल्यामुळे तिला बाहेर पडता आले नाही. यामुळे अडकून तिचा मृत्यू झाला असावा.  याबाबत तपास सुरु असुन या मागची वस्तुस्थिती समोर येणार आहे.
- शशिकांत खोत, पोलिस निरीक्षक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman was killed by a moving motor vehicle in aamboli kokan marthi news