धक्कादायक ! सावंतवाडी शहरातील महिलेचे कोरोनाने निधन 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

सोमवारी तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना उपचाराकरीता ओरोस येथे हलविण्यात आले होते. आज सकाळी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता; मात्र काही वेळातच त्यांचे निधन झाले.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यामध्ये आज पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. त्यामुळे तालुक्‍याची रुग्णसंख्या 232 वर पोहचली आहे. शहरातील एका महिलेचे ओरोस रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. याबाबतची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी दिली. 

तालुक्‍यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तालुक्‍याच्या तुलनेत शहराचा विचार करता चतुर्थी काळात शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. आज सबनीसवाडा येथील एका महिलेचे कोरोनामुळे उपचार सुरु असताना निधन झाले. ज्या एकाच कुटुंबात पाच रुग्ण आढळून आले त्याच्या शेजारीच ही महिला राहत होती.

सोमवारी तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना उपचाराकरीता ओरोस येथे हलविण्यात आले होते. आज सकाळी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता; मात्र काही वेळातच त्यांचे निधन झाले. संबंधित महिलेचे मुळ घर निरवडे येथे आहे; मात्र त्या शहरातच राहत असत; परंतु हॉस्पीटल पत्ता देताना त्यांनी निरवडे असा दिला होता, असे डॉ. उमेश मसुरकर यांनी सांगितले. कोरोनाचे नियम पाळत उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. 

तालुक्‍यात आज सायंकाळपर्यंत पाच जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आंबोली दोन, कारिवडे, माडखोल व माजगाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तळवणे येथील एकजण पॉझिटिव्ह असुन रात्री उशिरा आलेल्या अहवालात त्याचा समावेश आहे. आत्तापर्यंत तालुक्‍यात 232 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह 
सावंतवाडी पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा कर्मचारी एका शासकीय कार्यालयात ड्युटीवर होता.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Dies Due To Corona In Sawantwadi City