चिपळूणात हायटेक बसस्थानक केव्हा होणार ? काम अद्याप रखडलेलेच 

नागेश पाटील
Wednesday, 23 September 2020

करोडो रुपये खर्च करून सुखसुविधायुक्त अशा हायटेक मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम गेले काही महिन्यांपासून बंद आहे. बांधकाम ठेकेदारच गायब झाला काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. एस. टी. महामंडळाच्या निष्क्रियतेमुळे हे बांधकाम पूर्ण होत नसून त्यावर झाडीझुडपे उगवू लागली आहेत.

चिपळूण ( रत्नागिरी ) - मोठा गाजावाजा करीत चिपळूण हायटेक बसस्थानकाचे वर्षापूर्वी भूमिपूजन झाले. अद्ययावत बसस्थानक उभारणीसाठी खोदाई झाली. काही ठिकाणी किरकोळ सांगाडा उभारण्यात आला; मात्र त्यापुढे बसस्थानकाचे काम केलेले नाही. अद्ययावत बसस्थानक खड्ड्यातच रुतल्याची स्थिती आहे. त्यामुळे हायटेक बसस्थानक खड्ड्यातून कधी उड्डाण घेणार? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. 

करोडो रुपये खर्च करून सुखसुविधायुक्त अशा हायटेक मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम गेले काही महिन्यांपासून बंद आहे. बांधकाम ठेकेदारच गायब झाला काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. एस. टी. महामंडळाच्या निष्क्रियतेमुळे हे बांधकाम पूर्ण होत नसून त्यावर झाडीझुडपे उगवू लागली आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाची जीर्ण इमारत तोडून त्या ठिकाणी हायटेक, सोयी सुविधायुक्त असे अत्याधुनिक स्वरूपाचे बसस्थानक उभे राहण्यास काहीशी सुरवात झाली होती; मात्र सुरवातीपासूनच बसस्थानकाच्या बांधकामाचा पूर्णतः बट्ट्याबोळ उडाल्याचे चित्र आहे. 

यामुळेच दीड वर्षाचा कालावधी उलटला तरीदेखील या इमारतीचा पाया पूर्णत्वास गेलेला नाही. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्च करून हे बसस्थानक उभे केले जात असताना याकडे खुद्द एस. टी. महामंडळाची डोळेझाक होत असल्याचे चित्र आहे. यात एस. टी. महामंडळच निष्क्रिय ठरल्याने प्रवाशांसह स्थानक आगार प्रशासनास मनस्ताप सहन करावा लागत आहे. लॉकडाउनच्या कालावधीत बसस्थानकाचे बांधकाम ठेकेदाराकडून अधूनमधून केले जात होते; मात्र त्यानंतर हे बांधकाम बंद झाले ते अद्यापही सुरू झालेले नाही.

अर्धवट बांधकामावर झाडीझुडपे उगवली असून बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी साहित्यास गंज पकडला आहे. ते वापरण्यायोग्य नसल्याचे बोलले जात आहे. पिलर उभा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचत असून त्यास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

कारभार चालवणे अवघड 
अपुऱ्या जागेत अवाढव्य बसस्थानकाचा कारभार चालवणे अवघड बनत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठीच्या ब्रीदचा चांगलाच बोजवारा उडाला आहे. इतकेच नव्हे, तर याविषयी स्थानिक आगार प्रशासनास याची कल्पनादेखील नाही. आढावा बैठकीत बसस्थानकाच्या बांधकामाचा प्रश्न उपस्थित होताच हे अधिकारीदेखील आपल्या मर्जीप्रमाणे सभागृहात कारणे सांगून मोकळे होतात. 

चिपळूण आगारात हायटेक बसस्थानक उभारण्यात येणार आहे. मात्र, या इमारती संदर्भात विभागीय कार्यालयाकडून पत्र्यव्यवहार सुरू आहे. हायटेक बसस्थानकावर विभागीय कायालयाचे नियंत्रण आहे. त्यामुळे रखडलेल्या कामाविषयी अधिक माहिती नाही. 
- श्री. राजेशिर्के, आगार व्यवस्थापक, चिपळूण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work Of High Tech Bus Stand In Chiplun Pending Ratnagiri Marathi News