सिंधुदुर्गात गणेशोत्‍सवासाठी चाकरमान्यांचा ओघ सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sindhudurg

सिंधुदुर्गात गणेशोत्‍सवासाठी चाकरमान्यांचा ओघ सुरू

कणकवली : गणेशोत्‍सव दणक्‍यात साजरा करण्यासाठी हजारो चाकरमान्यांचा ओघ सिंधुदुर्गात सुरू झाला आहे. आज दुपारपर्यंत तब्‍बल सहा गणेशोत्‍सव विशेष रेल्‍वे गाड्या जिल्ह्यात दाखल झाल्‍या. याखेरीज नियमित पाच रेल्‍वे गाड्यातूनही हजारो चाकरमानी गावोगावी दाखल झाले. चेकपोस्ट, स्थानकावर कोरोना चाचणीची सक्‍ती नसली तरी नोंदणी प्रक्रियेला वेळ होत असल्‍याने सिंधुदुर्गात आलेल्‍या चाकरमान्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली. तर चाकरमान्यांच्या आगमनांमुळे गावे गजबजली असून बाजारपेठांतील उलाढाल देखील वाढली आहे. शुक्रवार (ता.१०) पर्यंत पाच लाख चाकरमानी जिल्ह्यात दाखल होण्याचा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

गतवर्षी कोरोना संसर्गाच्या धोक्‍यामुळे गणेशात्‍सवात चाकरमानी जिल्ह्यात आले नव्हते. यंदा मुंबईसह कोकणात कोरोना नियंत्रणात आल्‍याने प्रचंड संख्येने चाकरमानी जिल्ह्यात रेल्‍वे आणि रस्ता मार्गे दाखल होत आहेत. जिल्हयात खारेपाटण चेकपोस्ट येथे खासगी आरासम बसेस, एस.टी. महामंडळाच्या बसेस आणि इतर वाहने यांच्यामधून येणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष उभे करण्यात आले आहेत. मात्र येणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असल्‍याने चाकरमान्यांना एक ते दोन तासाचा विलंब चेकपोस्टवर होत आहे. रेल्‍वे स्थानकातही नोंदणी केली जात असल्‍याने तेथेही चाकरमान्यांना एक ते दीड तास थांबवे लागत आहे.

हेही वाचा: सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्या : महावितरण

दरम्‍यान गेले दोन वर्षे मंदीच्या छायेत असलेला वाहतूक व्यवसाय चाकरमान्यांच्या आगमनामुळे तेजीत आला आहे. गावोगावी चाकरमानी दाखल होत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांतील वर्दळ वाढली आहे. पुढील दोन दिवसांत चाकरमान्यांचा ओढ आणखी वाढणार आहे. कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने यंदा १५० विशेष गाड्या सोडल्‍या असून त्या ३ सप्टेंबर पासून कोकण रेल्‍वे मार्गावर धावत आहेत. याखेरीज दररोज सरासरी २० ते २५ एस.टी. बसेस माध्यमातूनही चाकरमानी जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. मुंबईहून सिंधुदुर्गात येण्यासाठी सुमारे दोनशे बसेसचे बुकिंग झाले आहे.

गणेशोत्‍सवात मुंबईतून कोकणात दररोज बारा विशेष रेल्‍वे गाड्या धावणार आहेत. यात आज दुपारपर्यंत सीएसटीएम मडगाव, सीएसटीम सावंतवाडी, पनवेल-सावंतवाडी, एलटीटी मडगाव, एलटीटी सावंतवाडी, एलटीटी कुडाळ या विशेष रेल्‍वे गाड्या दाखल झाल्‍या होत्या. याखेरीज नियमित धावणारी कोकणकन्या, मांडवी, तुतारी, मंगलोर, जनशताब्‍दी, मंगला, नेत्रावती या गाड्यातूनही हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले.

Web Title: Worker Start Flowing Ganeshotsav Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kokan