तहसील परिसर सुना सुना ; कणकवलीत शासकीय कामकाज ठप्प

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतल्याने कामकाजावर परिणाम झाला.

कणकवली (सिंधुदुर्ग) : तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याने नागरिकांना घरी परतावे लागत होते. त्यामुळे तहसील परिसर सुना सुना होता. विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतल्याने कामकाजावर परिणाम झाला. शिक्षक, बॅंक कर्मचारी, केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय कामकाजावर परिणाम झाला.

जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून कणकवलीकडे पाहिले जाते. येथे तहसिल कार्यालयात मोठी गर्दी असते. खरेदी - विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे नियमितपणे येथे गर्दी असते. गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसील कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी अनेक बंधने घातली होती. त्यामुळे नागरिक कामाव्यतिरिक्त परिसरात येतही नव्हते; मात्र गेल्या काही दिवसापासून परिस्थिती सुरळीत झाल्याने नागरिक आपली रखडलेली कामे घेऊन तहसील कार्यालयापर्यंत येत होते; मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध संघटनांनी संपाची हाक दिल्याने येथील महसूल अधिकारी आणि कर्मचारी संपात उतरले होते. त्यामुळे नायब तहसीलदार पासून कनिष्ठ लिपिक ते शिपाई पर्यंत संपात सहभागी झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा - दुर्देवी ! आजोबांच्या डोळ्यांसमोरच चार वर्षाच्या नातवावर काळाने घातला घाला -

परिणामी बहुतांशी कार्यालयांना टाळले होते. दुय्यम निबंधक कार्यालय असो, पुरवठा विभाग, जन्म मृत्यू नोंद विभाग, तलाठी विभाग, संजय गांधी निराधार योजना विभाग बंद असल्याने आज सेतू कार्यालयातही वर्दळ नव्हती. त्यामुळे कणकवलीच्या तहसील कार्यालयाच्या आवारात नागरिकांची फारशी गर्दी नव्हती. शिक्षक संघटनांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला; मात्र तहसीलदार रमेश पवार यांच्या दालनाला ही कुलूप होते.

दालनाबाहेरील शिपाई विविध संघटनांचे सभासद असल्याने तेही संपात उतरले होते. त्यामुळे शंभर टक्के हा संप यशस्वी झाल्याचे चित्र सकाळच्या सत्रात दिसून येत होते. महसूल स्तरावर आउटसोर्सिंग विभाग डाटा ऑपरेटर कार्यान्वित आहेत. त्यामुळे निवडणूक विभाग आणि एमआरईजीएस विभागातील डाटा एन्ट्री कर्मचारी आऊटसोर्सिंग असल्याने त्यांची उपस्थिती वगळता बहुतांशी महसूलचे कर्मचारी संपात उतरल्याचे चित्र होते. दुय्यम निबंधक कार्यालय बंद असल्याने खरेदी विक्रीचे अर्थात मालमत्ता संबंधितचे व्यवहार ठप्प होते; मात्र १०० पासून पाचशे रुपये पर्यंतचे दस्त (स्टम्पपेपर) खरेदीसाठी नागरिकांची थोडीफार उपस्थिती होती.

हेही वाचा -  गोलमाल हें भाई, सब गोलमाल हें ; बनावट आरसी बुक घोटाळ्यात तब्बल ९० लाखांचा गंडा -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the working of government offices stopped reason employment strike in sindhudurg