राज्यात प्रथमच धामापूर तलावाला जागतिक सन्मान

प्रशांत हिंदळेकर
Monday, 30 November 2020

26 नोव्हेंबरला सकाळी दिल्लीवरून सेंट्रल वॉटर कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांना फोन करून आणि इमेलद्वारे तलावाबद्दलच्या या सन्मानाची माहिती दिली. 

मालवण (सिंधुदुर्ग) - निसर्गरम्य धामापूर गावात असलेल्या धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले आहे. आतापर्यंत भारतात तेलंगणा राज्यातील दोन साईट्‌सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यावर्षी आंध्रप्रदेशमधील तीन साईट्‌स आणि महाराष्ट्रात प्रथमच धामापूर तलावाला हा जागतिक सन्मान मिळाला. 26 नोव्हेंबरला सकाळी दिल्लीवरून सेंट्रल वॉटर कमिशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्यमंतक संस्थेचे संस्थापक सचिन देसाई यांना फोन करून आणि इमेलद्वारे तलावाबद्दलच्या या सन्मानाची माहिती दिली. 

प्राचीन धामापुर तलावाचे वैभव आणि संस्कृती संवर्धन अणि संरक्षण करण्यासाठी गेले अनेक वर्ष धामापुर येथील स्यमंतक संस्था जीवन शिक्षण विद्यापीठ या उपक्रमातून प्रयत्न करत आहे. त्यासाठी धामापूर गावाची जैविक संपदाचे डॉक्‍युमेंटेशन आणि त्या संबंधी प्रशासकीय व्यवस्था आणि तज्ज्ञ मंडळींशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सिंचन आणि ड्रेनेज कमिशन (आयसीआयडी) द्वारे धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरीगेशन साईट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल हे नक्की. ही एक सुरवात आहे, अशा अनेक गोष्टी या जिल्ह्यामध्ये शाश्वत राहणीमान आणि वाईस ट्युरीझम यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सिंधुदुर्ग हे एक युनिक ट्युरीझम गंतव्य स्थान आहे; परंतु आज याची अवस्था ट्रेनच्या जनरल कंपार्टमेंट सारखी झाली आहे. जो तो फक्त पैसे कमावण्यासाठी काहीही, कसाही व्यवसाय करत आहे. 

आपल्या जैविक संपदा, हेरिटेज साईट्‌स राखून, त्याचा अभ्यासकरून, साधे पण एक उच्च दर्जेचे जीवन आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगू शकतो आणि हेच आपले पर्यटनाचे यूएसपी असू शकते. या गोष्टींची आठवण राहावी आणि आपले हे समृद्ध जीवन अभ्यासायला, अनुभवायला जगभरातून अभ्यासूंनी सिंधुदुर्गमध्ये यावे यासाठी एक छोटेसे पाऊल स्यमंतक तर्फे घेण्यात येत आहे. आणि त्या अनुषंगाने लवकरच मी धामापूर तलाव बोलत आहे ही डॉक्‍युमेंटरी रिलिज केली जाणार आहे. अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली. 

- आजपर्यंतच्या जगातील 74 हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्‍चरमध्ये धामापूर तलावाने हा जागतिक सन्मान मिळवला आहे. 
- सर्वांत जास्त हेरिटेज साईट्‌स जपानमध्ये 35, पाकिस्तानमध्ये 1, श्रीलंकेत 2 असून त्यांना याआधी गौरविले आहे. 
- स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्‍युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले होते. 
- सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे आयसीआयडी 71व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये तलावाला सन्मान दिला जाईल. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world honor to dhamapur lake in konkan sindhudurg