World Senior Citizens Day Special : कोरोना काळातही ज्येष्ठांचा एकमेकांना आधार

मकरंद पटवर्धन
Thursday, 1 October 2020

सुभाष थरवळ ; पोलिसांसह ज्येष्ठ नागरिक संघाची मदत

रत्नागिरी : कोरोना महामारीमुळे 65 वर्षांवरील काही ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा झाली. परंतु रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने संघाशी किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यामुळे गरजू ज्येष्ठांना विविध प्रकारची मदत पोहोचवता आली, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिक दिनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मनमोकळेपणाने माहिती दिली. कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने 65 वर्षे वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यावर बंदी आणली. अपवाद फक्त अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा. ज्या ज्येष्ठांच्या घरी मुलेबाळे अथवा कुटुंबीय आहेत अशा व्यक्तींना याचा त्रास झाला नाही. परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले नोकरी, व्यवसायानिमित्त त्यांच्यापासून दूर आहेत किंवा विभक्त कुटुंबपद्धती आणि आपल्या जोडीदाराचे निधन झाल्यामुळे किंवा अविवाहित असणार्‍या व्यक्तींना फार त्रास होत होता. यासाठी आवाहन केल्याप्रमाणे अनेकांनी संघ किंवा पोलिसांशी संपर्क साधला.

हेही वाचा- कुंपणाच्या वादातून युवकाचा  निर्घृण खून -

श्री. थरवळ म्हणाले, रत्नागिरी तालुक्यासह दाभोळ, दापोली, गुहागर, चिपळूण तालुक्यातील अनेक ज्येष्ठांनी संपर्क साधून त्यांच्या अडचणी मांडल्या. गोळप येथील श्री. जोशी यांना मदतीची आवश्यकता होती. पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून त्यांना मदत करण्यास सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. सासने यांनी तत्परतेने सहाय्य केले.

विमाकवच मिळणार का?

आमच्यासारख्या ज्येष्ठांना विमाकवच मिळणार का? असा प्रश्‍न सर्व ज्येष्ठांना पडला आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठांना कोणतीही कंपनी मेडिक्लेम नव्याने देत नाही. त्यामुळे आताच्या काळात ज्येष्ठांना कोरोना झाल्यास झालेल्या खर्चाचा परतावा कसा मिळणार. स्वनिधीतून तो खर्च करायचा आहे का? याबाबत शासनाने माहिती द्यावी, अशी मागणी सुभाष थरवळ यांनी केली आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world senior citizens day special story by makarand patwardhan