सायकलपटूची जीद्द! 40 तासांत 600 कि.मी. पार

अजय सावंत
Thursday, 29 October 2020

जिमला जाण्यासाठी एक सायकल विकत घेतली आणि एक दोन वेळा सायकल चालवली आणि तशीच घरात पडून राहिली. जिममध्ये सायकलविषयी चर्चा असायच्या त्या ऐकून उत्साह वाढायचा.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - सायकलिंगमध्ये ध्येयवेडा ठरलेल्या कुडाळच्या रूपेश तेली या युवकाने निपाणी ते पुणे हे 600 किलोमीटर अंतर 40 तासांत पूर्ण केले. गेली तीन वर्षे अनेक संकटाशी सामना करीत हे ध्येय गाठले. तो सुपररॅंडॉनेउरचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी त्याने 200, 400 किलोमीटर राईड यशस्वी केली. 

व्यवसायाने व्यापारी असलेला येथील रुपेश रोटरी या इंटरनॅशनल सेवाभावी संस्थेचा कुडाळचा सभासद आहे. महाराष्ट्रसह गोवा, हुबळी या ठिकाणी त्याने सायकलिंगमध्ये एक विशेष भरारी घेतली आहे. याबाबत ते म्हणाले, ""जिमला जाण्यासाठी एक सायकल विकत घेतली आणि एक दोन वेळा सायकल चालवली आणि तशीच घरात पडून राहिली. जिममध्ये सायकलविषयी चर्चा असायच्या त्या ऐकून उत्साह वाढायचा. जुलै 2018 मध्ये रोटरी पदाधिकारी व सायकलिंग मेंबर गजानन कांदळगावकर, प्रमोद भोगटे, प्रेमेंद्र पोरे, अमोल शिंदे, अविनाश पाटील, योगेश नाडकर्णी, राजीव पवार, अजिंक्‍य जामसंडेकर यांच्याबरोबर पहिली राईड ही 72 किलोमीटर एवढी झाली. त्यानंतर सायकलची आवड वाढत गेली. 14 ऑक्‍टोबर 2018 ला अविनाश पाटील आणि अथर्व सामंत यांच्याबरोबर पहिली 100 किलोमीटरची पणजीतील संस्थेने घेतलेली राईड यशस्वी केली. रोज पहाटे सायकलिंगला बाहेर पडायचो. त्याबरोबर सायकलिंगचे फायदेही लक्षात येऊ लागले होते. अनुभव पण येत होते.'' 

ते पुढे म्हणाले, ""200 ची पहिली राईड 4 नोव्हेंबर 2018ला गोव्यात झाली. या राईडला माझ्याबरोबर अल्ट्रा सायकलिस्ट पुष्कर कशाळीकर होता. त्याच्या सल्ल्यानुसार पूर्वतयारी करून सज्ज होतो. या राईडमध्ये बरेच अनुभव आले. यानंतर अनेक राईडमध्ये सहभाग घेतला. बरेच अडथळे आले. अनुभवही खूप मिळाले; पण यातून शिकता आले.''  रोटरी क्‍लब ऑफ कुडाळच्यावतीने रुपेशचे येथील हॉटेल स्पाइस कोकणमध्ये अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्री. कांदळगावकर, प्रणय तेली, प्रमोद भोगटे, राजन बोभाटे, अभिषेक माने, राकेश म्हाडदळकर, अमोल शिंदे उपस्थित होते. 

बराच संघर्ष 
तेली म्हणाले, ""या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी बराच संघर्ष केला. अनेक अडथळे पार केले. सिंधुदुर्गात एक तरी सुपररॅंडॉनेउर (एसआर) आणायचा ही खूणगाठ बांधली. यातून मार्ग मिळत गेला. निपाणी ते पुणे हे 600 किलोमीटर अंतर 40 तासात पूर्ण करून एसआर मिळवण्याचे स्वप्न साकारले. पुढे बराच पल्ला गाठायचा आहे.'' 

मार्गदर्शकांना श्रेय 
ते म्हणाला, ""यासाठी सगळ श्रेय माझ्या कुडाळ सायकल क्‍लब तसेच रेनबो रायडर्स सुकळवाड तसेच ब्युटीस ऑन व्हील कट्टा पॅडिस अँड व्हील सिंधुदुर्गला देतो. शिवाय या सगळ्यामध्ये क्षणोक्षणी साथ मला माझे मित्र गजानन कांदळगावकर, डॉ. बापू परब, प्रेमेंद्र पोरे, प्रमोद भोगटे, शिवप्रसाद राणे आणि निलेश आळवे यांनी खरी साथ दिली.'' 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young cyclist from Kudal covered a distance of 600 km