रत्नागिरीतील अपघातात तासगावची तरुणी ठार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

अपघातात दुचाकीवरील तरुणी जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

रत्नागिरी - तालुक्‍यातील करबुडे येथे ट्रकने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणी जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोमल तानाजी सावंत (वय 22, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरूणीचे नाव असून, सूरज संपत पाटील (29, वाघ गल्ली, मांगले, ता. शिराळा) असे जखमी तरूणाचे नाव आहे. अपघात दुपारी साडेबारा वाजता करबुडे फाटा येथे झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी, जयसिंगपूरहून (जि. कोल्हापूर) दोघे आज गणपतीपुळे येथे दुचाकीवरून फिरण्यासाठी निघाले होते. निवळी ते गणपतीपुळे असा प्रवास करीत असताना करबुडे फाट्यापासून काही अंतरावर समोरून आलेल्या ट्रकने हुलकावणी दिली. दुचाकीस्वाराला त्याचा अंदाज न आल्याने रस्ता सोडून दुचाकी खाली कोसळली. अपघातात कोमल हिला जबर मार बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सूरज गंभीर जखमी झाला. 

हे पण वाचाअन्यथा भविष्यात बेरोजगार पिढी दगड हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहील 

दरम्यान, या अपघातातील मृत तरुणी जयसिंगपूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. ती शेवटच्या वर्षाला होती, तर तरुण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहे. पोलिस निरीक्षक सुरेश कदम याचा अधिक तपास करीत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young girl dead in accident at ratnagiri