
गोविंद नाईक गोव्यात कामाला आहे. गेल्या वर्षभरापासून तो तिच्यामागे आहे. त्याने संबंधित युवतीला लग्नाची मागणी घातली होती; मात्र युवती त्याचे ऐकत नसल्याने तो मोटारसायकलने पाठलाग करून त्रास देत होता.
माझ्याशी लग्न नाही केलं तर...
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्या आई-वडिलांना ठार मारीन, अशी धमकी देऊन अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोविंद शंकर नाईक (वय 25 रा. आरोस, दांडेली वरचावाडा) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात पॉक्सो (लैगिंक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण 2012) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - गोविंद नाईक गोव्यात कामाला आहे. गेल्या वर्षभरापासून तो तिच्यामागे आहे. त्याने संबंधित युवतीला लग्नाची मागणी घातली होती; मात्र युवती त्याचे ऐकत नसल्याने तो मोटारसायकलने पाठलाग करून त्रास देत होता. या युवकाला कुटुंबियांकडून समज देण्यात आली होती; मात्र असे असतानाही काल (ता.11) गोविंद याने युवतीला तू माझ्याशी लग्न कर, तुझ्याशी प्रेम आहे, तू लग्न नाही केल तर मी तुझ्या आई वडिलांना ठार मारेन, अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या युवतीने आपल्या आईवडिलांना सांगितले. त्यानुसार तिच्या वडिलांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.
त्यानुसार गोविंदवर पॉक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब बाबर, हवालदार गुरुदास नाईक यांनी गोविंदला रात्री अटक केली. त्याच्याकडील मोबाईल व मोटरसायकल जप्त केली. त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. याबाबतचा तपास महिला पोलिस अधिकारी रुपाली गोरड करीत आहे.