पोफळी गटात सेना-राष्ट्रवादीची कडवी झुंज | Chiplun | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेना-राष्ट्रवादी

चिपळूण : पोफळी गटात सेना-राष्ट्रवादीची कडवी झुंज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांचे सुपुत्र अजिंक्य कदम हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ते पोफळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पोफळी गटातून निवडणूक लढवल्यास त्यांना शिवसेनेशी कडवी झुंज द्यावी लागेल. जर शिवसेनेने या गटातून नवखा उमेदवार दिला तरच कदम यांचा जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग सोपा होईल.

पोफळी जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता; परंतु पाच वर्षांपूर्वी शिवसेनेने या गटावर वर्चस्व मिळविले. पोफळीचे माजी सरपंच चंद्रकांत सुवार यांच्या पत्नी सुचिता सुवार या गटातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आणि पोफळी गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. पोफळी जिल्हा परिषद गटात टेरव आणि पोफळी असे दोन पंचायत समिती गण येतात. या निवडणुकीसाठी पोफळी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला कडवी झुंज देईल, असा उमेदवार या गटात राष्ट्रवादीकडे नाही. अनेकांची शक्ती मागील पाच वर्षांत संपली. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता असलेल्या अजिंक्य यांनाच गटातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे.

हेही वाचा: परळीत एसटीचे दहा कर्मचारी निलंबित

सद्यःस्थितीत पोफळी गटात शिवसेनेकडेही तगडा उमेदवार नाही परंतु गावोगावी शिवसेना भक्कम आहे. निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना चार्ज करून निवडणूक जिंकण्याची कला शिवसेना नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी कोणालाही निवडून येण्याची खात्री नाही. अजिंक्य सहज निवडून आले तर शिवसेनेला या गटात थांबवण्याचा राष्ट्रवादीचा हेतू साध्य होईल.

टेरव गणातच लागणार कस

माजी आमदार रमेश कदम यांचे सुपुत्र म्हणून अजिंक्य यांना पसंती मिळेल. पुत्राला निवडून आणण्यासाठी कदम हे आपले कसब वापरणार. दसपट्टीचा सुपुत्र निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे दसपट्टीतील कदम आणि शिंदे घराण्याची मते अजिंक्यला मिळावीत यासाठी प्रयत्न केले जातील. राष्ट्रवादीची सर्व यंत्रणा प्रामाणिकपणे काम करेल. व्यवसायाने वकील असलेले अजिंक्य राजकारणात प्रथमच प्रवेश करत आहेत. मागील निवडणुकीत अजिंक्य यांचे मूळ गाव असलेल्या टेरव पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली होती. यामुळे प्रथम टेरव पंचायत समिती गणात बांधणी करावी लागणार आहे.

loading image
go to top