
वैभववाडीत भाजप मजबूत; शिवसेनेची कसोटी
वैभववाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपवासी झाल्याने या पक्षाची तालुक्यातील ताकद वाढली असून, भाजप मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला जिंकलेल्या जागा राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तीन जिल्हा परिषद मतदारसंघांचे आरक्षण जाहीर झाल्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
वैभववाडी तालुक्यात कोळपे, कोकिसरे आणि लोरे असे तीन जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना-भाजप युती लढली होती. त्यावेळी कोळपे काँग्रेस, कोकिसरे भाजप तर लोरे जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेनेने जिंकला होता; परंतु आताची स्थिती वेगळी आहे. केंद्रीयमंत्री राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाने एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीच्या जागा जिंकत आपली ताकद सिद्ध केली होती. त्यामुळे सध्या तालुक्यात भाजप भक्कम स्थितीत आहे.
सद्य:स्थितीत कोळपे जिल्हा परिषद हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात कोळपे आणि भुईबावडा पंचायत समिती असे दोन प्रभाग येतात. भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी अनेक वर्षे कोळपे जिल्हा परिषद प्रभागात काम करीत प्राबल्य राखले आहे.
याशिवाय, भालचंद्र साठे यांनीही भुईबावडा पंचायत समिती मतदारसंघावर आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. याशिवाय याच जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, तालुका खरेदी-विक्री संघाचे महेश संसारे, स्वप्नील खानविलकर, हुसेन लांजेकर असे प्रभावी पदाधिकारी आहेत. त्यामुळे कोळपे प्रभागात भाजप मजबूत स्थितीत आहे. या मतदारसंघात भाजपासमोर आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. शिवसेनेकडे या मतदारसंघात कार्यकर्त्यांची टीम भाजपाच्या तुलनेत खुपच कमी आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये देखील कार्यकर्त्यांची वानवा आहे.
कोकिसरे जिल्हा परिषद हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या निवडणुकीत ही जागा भाजपाने जिंकली होती. त्यातच आता राणेंचे अनेक कार्यकर्ते भाजपात आल्यामुळे या मतदारसंघात देखील भाजपा मजबूत स्थितीत आहे. कोकिसरे, नाधवडे, उंबर्डे, कुसुर या मोठी मतदारसंख्या असलेल्या गावांवर भाजपाची पकड आहे. निवडणुकीची रणनीती माहीत असलेले शेकडो पदाधिकारी या प्रभागात आहेत. असे असले तरी या जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना भाजपासमोर कडवे आव्हान निर्माण करू शकेल अशी स्थिती आहे.
लोरे जिल्हा परिषद मतदारसंघावर सध्या शिवसेनेचा सदस्य आहे. हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. या मतदारसंघात दोनही पक्षांना समान संधी आहे. या मतदारसंघात लोरे आणि खांबाळे हे पंचायत समिती प्रभाग आहेत. पंचायत समितीचे उमेदवार कोण असणार? यावरच येथील जिल्हा परिषद मतदारसंघाचे गणित अवलंबून असणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण अजुनही पडलेली नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण निश्चित होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही.
नाराजी थोपविण्याचे आव्हान
मतदारसंघ कमी आणि उमेदवार अधिक अशी भाजपची स्थिती आहे. त्यामुळे नाराजांना थोपविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर असेल. नाराजी थोपविण्यात जर पक्षश्रेष्ठींना यश आले, तर भाजपला मोठा फायदा या निवडणुकीत होऊ शकेल.