जिंदगीका सफर है ये कैसा सफर

जिंदगीका सफर है ये कैसा सफर

( २३ मे टुडे ३ )

लाल मातीतील अर्क-अर्कट--------लोगो

- rat५p१.jpg-
P२४M८८०९६
राजा बर्वे

इंट्रो

स्वतःच्या न कळत्या वयात दिसत असलेली माणसे नंतर आपल्या कळत्या आणि कर्तृत्वाच्या वयातदेखील परत संपर्कात येतात तेव्हा त्यांचा उंचावत गेलेला कर्तृत्वाचा ग्राफ आणि मोठेपणा अधिक भावतो. माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षांपासून आजतागायत असाच कोकणातलाच एक अवलिया सलीम माझ्या संपर्कात आला आणि आजही संपर्कात आहे.

- राजा बर्वे, परशुराम

----
जिंदगीका सफर है ये कैसा सफर


१९७३/७४ मध्ये मी हायस्कूलला असताना बाजारपेठेत काही कामानिमित्त सायकलवरून नेहमी फिरायचो. सायकल चालवायला मिळते या आनंदापुढे काम काहीच वाटत नसे. फिरत असताना अप्सरा हॉटेलसमोर हातगाडीवर विकायला असलेल्या सोनी कंपनीच्या प्लास्टिक वेष्टनात गुंडाळलेल्या चकचकीत ऑडिओ कॅसेट्स माझे कायम लक्ष वेधून घ्यायच्या. एक पंचविशी-तिशीतला बोहरी मेमन समाजाचा किडकिडीत; परंतु तरतरीत तरुण सलीम त्या विकायचा. त्या काळात नॅशनल पॅनासोनिक कंपनीचा टेपरेकॉर्डर आणि सोनी कंपनीच्या कॅसेट्स घरात असणे ही चैनीची परमावधी होती. बिनाका गीतमाला दर बुधवारी आम्ही ऐकत असायचो आणि ती ''पायदान'' वाली गाणी त्या हातगाडीवर लावलेली असायची. हातोहात कॅसेट्स संपायच्या. मी मुद्दाम तिथे सायकल लावून थांबून गाणी ऐकत असे. खरेदी करण्याइतका मी मोठा नव्हतो आणि घरात टेपरेकॉर्डर काय साधा ट्रान्सिस्टरदेखील नव्हता.
काही काळ निघून गेला. माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झालं. नोकरीला बँकेत लागलो. बाहेरगावी ८/१० वर्ष असल्याने शहराशी संपर्क फार राहिला नाही. सलीमदेखील माझ्या स्मरणातून अंधूक होत गेला. सीडीप्लेअरचा जमाना आला आणि कॅसेट्सचे मार्केट कमी होत गेले. सलीम, त्याची हातगाडी आणि कॅसेट्सदेखील बाजारपेठेत कुठे दिसेनात.
परत माझी बदली झाली आणि मी शहरातल्या बँकेत रूजू झालो. एक दिवस माझ्या कॅश काउंटरवर सलीम टोकन घेऊन पेमेंटसाठी उभा होता. त्याच्यात बदल झाला होता; पण तरीही मी त्याला ओळखले. एव्हाना त्याने चाळीशी जवळ केली होती आणि मी पंचविशीत होतो. पांढरीशुभ्र कॉटन पॅन्ट, तसाच शर्ट, मध्यम उंची, अंगाने अजून भरलेला, थोडं टक्कल पडलेलं, कोरलेली आणि मेंदी लावून तांबूस केलेली दाढी, दोन भुवयांच्या मध्ये थोडा आडवा काळसर डाग, डोळ्यात अंधूक सुरमा, हाफ शर्टाच्या उजव्या बाहीतून डोकावणारा दंडाला घट्ट बांधलेला तावीज. माझ्याकडे पाहून तो देखील ओळखीचे हसला आणि नंतरच्या गेल्या तीस वर्षात बँकेच्या आणि इतर वेगवेगळ्या कारणांनी सलीमभाई आजही संपर्कात आहे. वेगवेगळ्या वेळी गप्पा मारताना सलीमचा ''सलीमशेठ'' होईपर्यंतचा प्रवास मला स्तिमित करत गेला.
हातगाडीवर कॅसेट विकत असताना सलीम मोहल्ल्यातील एका पडक्या घरात एका खोलीत राहायचा. एक वयस्कर इब्राहिम चाचा एकटाच त्यात राहायचा. सलीमजवळ थोडा पैसा साठला, शादी केली आणि सलीमला चांगल्या घराची गरज वाटू लागली. इब्राहिम चाचाचे पडके घर जेमतेम एक-दीड गुंठ्यावर उभे होते. सलीमने त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला की, सलीम खर्च करून छोटे दुमजली घर बांधेल आणि खाली इब्राहिम चाचा आणि पहिल्या मजल्यावर तो स्वतः राहील. घर दुरुस्त करण्याच्यापलिकडचे होते आणि चाचाकडे पैसा नव्हता. सलीमने टुमदार घर बांधले आणि सलीम राहायला लागला; परंतु त्याचवेळी त्याच्या डोक्यात एका नव्या व्यवसायाने जन्म घेतला होता.
शहरात फ्लॅट संस्कृतीने हळूहळू शिरकाव केला होता. सलीमने छोट्या जागा आणि घरमालकांशी संपर्क साधला, जागा डेव्हलप करायला सुरवात केली. त्यानंतरची आज अखेर तीस-पस्तीस वर्षे सलीमची आणि सलीमच्या कर्तृत्वाची आहेत. गेल्या या साऱ्या वर्षात सलीमने जवळपास तीनशेपेक्षा अधिक लहान-मोठ्या बिल्डिंग बांधल्या. परवडणाऱ्या पैशात लोकांना फ्लॅट्स दिले. आज शहरातल्या एकाच रस्त्याच्या दुतर्फा जवळजवळ तीस-चाळीस बिल्डिंग सलीमने बांधल्या आहेत. शहराजवळच्या खेड्यातली मुस्लिम कुटुंबे शहरात मुलांना शिकायला आणून इथे फ्लॅट घेऊन राहतात. गल्फमध्ये काम करणारे लोक हे सलीमचे मार्केट आहे. फ्लॅट्ससोबत व्यापारी गाळेदेखील आहेत.
२०१० मध्ये त्यानेच बांधलेल्या बिल्डिंगमध्ये माझ्या बँकेने नवी शाखा उघडली आणि तिथे मी शाखाधिकारी म्हणून गेलो. त्याच दरम्याने अगदी जवळच सलीमने स्वतःला राहायला प्रशस्त पाच-सहा बेडरूम्स असलेला बंगला बांधला होता. शाखेच्या उद्घाटनाचे निमंत्रण द्यायला गेलो. सलीमने सगळा बंगला फिरून दाखवला आणि मी स्तिमित झालो. सलीमने खास चायनामधून फर्निचर मागवले होते. कुठेच कोणती कसूर ठेवली नव्हती. आज दोन मुले मदतीला असली तरी रोज सकाळी सात वाजता सलीम साइटवर न चुकता हजर असतो.
बँकेत सलीम आला की, कधी गप्पा होत. एकदा मी त्याला अप्सरा हॉटेलसमोरच्या हातगाडीची आठवण करून दिली आणि मी तेव्हा तिथे गाणी ऐकत उभा असायचो, हे सांगितलं तेव्हा त्याचे डोळे पाणावले.‘ साब, जिंदगी हर एकको जिंदगी सवारनेके तीन मौके देतीही है, मैने कॅसेट बेचना शुरू किया तब मेरे पास कुछभी नही था। कस्टमसे बाहर निकाला हुवा माल मुझे अब्दुलभाई उधारमें देता था. कॅसेट मार्केटमे बहुत तेजी थी। लेकीन माल निकालना बहुत मशक्कत का काम था। मैने मार्केट डाउन होतेही कन्स्ट्रक्शन लाईन पकडी। अभी भी फ्लॅट लेनेके लिये जब कोई कस्टमर आता है तो मुझे मेरा इब्राहिमचाचा और मेरा पहला घर याद आता है। खुदाकी मेहरबानीसे बहुत पैसा कमाया, बहुत लोगोंके बसेरेमे थोडा मेराभी हात रहा। अब्दुल मुझे हमेशा कहता था, ''देख सलीम, पैसा तो सिर्फ बहाना है जीनेका। कुछ ऐसा कर, लोग तुम्हे याद रखेंगे। पैसेका आना आगे-पिछे होता। नियत साफ रहेगी तो पैसा कभीभी डुबताभी नही। तैरकर तेरे जेबमें दुवाओंके साथ वापस आ जायेगा।’.. सलीम आजही मिळालेल्या व्याजाला हात लावत नाही..रमजानच्या महिन्यात त्या रकमेचा सदगा करतो, गोरगरिबांना वाटून मोकळा होतो.
आजही सलीम वाटेत भेटतो. दिसल्यावर हात करतो, कधी गप्पा होतात; पण तरीही मला तो दिसला की, आजही आठवत राहतो तो किडकिडीत सलीम. त्याची ती कॅसेट्सने भरलेली हातगाडी आणि टेपरेकॉर्डरवर लागलेली अनेक गाणी आणि सफर चित्रपटातले एक वरच्या पायदानवर पोचलेले गाणे.
जिंदगी का सफर है ये कैसा सफर
कोई समझा नहीं कोई जाना नही।

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com