रत्नागिरी जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीचे हात घडवतात गणेशमूर्ती 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

गणेश कार्यशाळांमध्ये कलाकार मूर्तींवर शेवटचा हात फिरविताना दिसत आहेत. त्यामध्ये तालुक्‍यातील कोंडसर बुद्रुक येथील नागले यांचाही समावेश आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागले यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठिकठिकाणी छोटी-मोठी कामे करताना सामाजिक क्षेत्राचा वसा खांद्यावर घेतला.

राजापूर ( रत्नागिरी ) - लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना वेळ कमी मिळतो. यातूनही सवड काढत जिल्हा परिषदेचा देवाचे गोठणे मतदारसंघातील सदस्य दीपक नागले यांचे हात गणेशमूर्ती घडविण्यामध्ये गुंतले आहेत. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ गणेशमूर्ती घडविण्याची जबाबदारीही ते लीलया पेलत आहेत. 

गणेश कार्यशाळांमध्ये कलाकार मूर्तींवर शेवटचा हात फिरविताना दिसत आहेत. त्यामध्ये तालुक्‍यातील कोंडसर बुद्रुक येथील नागले यांचाही समावेश आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागले यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठिकठिकाणी छोटी-मोठी कामे करताना सामाजिक क्षेत्राचा वसा खांद्यावर घेतला. कोंडसर बुद्रुकचे ते सरपंचही होते. यातून त्यांनी विविध सामाजिक कामांमध्येही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. शिवसेना संघटनेमध्ये कट्टर शिवसैनिक, संघटक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या अंगी असलेले विविध कलागुणही जोपासले आहेत. 

वडील तुकाराम नागले यांच्याकडून मूर्तिकलेचा आलेला वारसा गेल्या दोन दशकांपासून ते जोपासतात. काही गणपती बनविण्यासाठी ते साच्यांचा उपयोग करतात. अनेक मूर्ती ते हातानेही घडवतात. गणेश कार्यशाळेमध्ये मूर्ती घडविण्यासाठी त्यांना वाडीतील काही होतकरू तरुणांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अनेकजणांकडून वेळ नसल्याची कारणे सांगितली जातात. मात्र, त्याला नागले हे अपवाद ठरले आहेत. 

सामाजिक सेवेचा वसा घेताना मुर्तीकार म्हणून अंगभूत असलेली कलाही जोपासण्याचा प्रयत्न करतोय. याच्यातून मुर्तीकला जोपासल्याचा एक वेगळाच आनंदही मिळतो. जवळपास शेकडो गणपती स्वतः तयार करतो. हे गणपती स्थानिकांना सहज उपलब्ध होत असल्याने यातून जनतेची सेवा करण्याचीही संधी मिळते. 
- दीपक नागले, सदस्य, जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP Member Deepak Nagale Preserve Ganesh Idol Tradition