आम्ही चालवू हा शिक्षणाचा वारसा ; अडीचशेपेक्षा जास्त शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी झिजवले उंबरे

राजेश कळंबटे
Saturday, 5 September 2020

२,६७६ शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू असून २५५ शाळांमधील विद्यार्थ्यांना गृहभेटीतून शिकवले जात आहे.

रत्नागिरी : कोविडचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावरही झाला आहे; मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शहरी भागातीलच नव्हे तर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देण्यास सुरवात केली आहे. भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या गावात मोबाईलला रेंज नसली तरीही शिक्षणात खंड पडलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात २,९३० शाळा आहेत. त्यातील २,६७६ शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू असून २५५ शाळांमधील विद्यार्थ्यांना गृहभेटीतून शिकवले जात आहे. कोरोनाच्या संकटातही शिक्षकांचे ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू ठेवले जात आहे.

हेही वाचा -  ...म्हणून आम्ही पिल्ले विकून टाकली, आता तुम्हांला जातीची पिल्ले मिळणे कठीणचं ! 

जिल्ह्यात सुमारे ७५ हजार विद्यार्थी असून सहा हजार शिक्षक आहेत. बहुतांश शिक्षकांनी कोरोना कालावधीतही शिक्षणाचे कामकाज न थांबवता विविध पर्यायांचा उपयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा फंडा अवलंबला आहे. त्यात ऑनलाइन अभ्यासक्रमाची कास धरली. सह्याद्रीचा टीलीमीली कार्यक्रम शिकवणीचा मार्ग आहे. दीक्षा ॲपवरील अभ्यासक्रमाचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना मोबाईलवर व्हॉटस्‌ॲपद्वारे पाठवले जातात. ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत पण साधे मोबाईल आहेत त्यांच्याशी शिक्षक संवाद साधतात.

सराव प्रश्‍नपत्रिका तयार करून त्या व्हॉटस्‌ ॲपवरून सोडवून घेतात. मूल्यमापन करून त्रुटी सोडवल्या जात आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू असलेल्या २,६७६ शाळांपैकी २,३५४ शाळा जिल्हा परिषदेच्या तर ३२२ खासगी शाळा आहेत. ऑनलाइन सुविधा नसलेल्या २०७ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. रत्नागिरीत ३१७ जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ८२५ शिक्षक कार्यरत आहेत. तालुक्‍यात सुमारे १८ हजार विद्यार्थी आहेत. ऑनलाइनचा वापर न करणारे ५० टक्‍के तर साधे मोबाईल असलेले २० टक्‍के विद्यार्थी आहेत. ३० टक्‍के विद्यार्थ्यांचे शिक्षण गृहभेटीतूनच सुरू आहे. रत्नागिरी तालुक्‍यात रेंज नसलेले कळझोंडी, आगरनरळ, गडनरळ, डोर्ले, कुर्धे, गणेशगुळे गावातील काही भाग आहेत. जिथे मोबाईलला रेंजच नाही तिथे गृहभेटीचा पर्याय शिक्षकांनी 
अवलंबला आहे. 

हेही वाचा -  तळकोकणात पर्यटन सुरु करायचेय पण या आहेत अडचणी...

"कोरोनातील परिस्थितीमधून मार्ग काढत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शिक्षकांनी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. अडचणी आल्या तरीही त्यातून मार्ग काढला जात आहे."

- सुनील पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी, शिरगाव

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP school teachers also start online classes for students but due to range problem he going to students home for learning in ratnagiri