esakal | भारताचा आजपर्यंतचा मोठा विजय - कॉन्स्टटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

भारताचा आजपर्यंतचा मोठा विजय - कॉन्स्टटाईन

भारताचा आजपर्यंतचा मोठा विजय - कॉन्स्टटाईन

sakal_logo
By
यूएनआय

यांगून - एएफसी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत म्यानमारवर ६४ वर्षांनी विजय मिळविल्यानंतर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक कॉन्स्टटाईन यांनी भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील आठवणीत असलेला हा मोठा विजय ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारताने ६४ वर्षांपूर्वी म्यानमारविरुद्ध सामना जिंकला तेव्हा आता खेळत असलेल्या संघातील खेळाडू सोडा माझादेखील जन्म झालेला नव्हता. परदेशात भारतीय संघाला जिंकता येत नाही, हा डाग या विजयाने पुसला जाईल, असेदेखील कॉन्स्टटाईन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘परदेशात विजय मिळविण्यासाठी भारताला तब्बल ६४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. परदेशात मिळविलेल्या विजयाचे मोल वेगळेच असते. ते या संघाने अनुभवले आणि परदेशात जिंकता येत नसल्याचा डाग खोडून काढला. तोदेखील ६४ वर्षांनी याचा मला नक्कीच अभिमान आहे.’’

सामन्याविषयी बोलताना कॉन्स्टटाईन म्हणाले, ‘‘असा सामना होतो तेव्हाच मुळात फार काही महत्त्वाचा नाही, अशीच चर्चा होते. म्यानमार नक्कीच ताकदवान संघ नाही. पण, तरी भारताला त्यांच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी इतकी वर्षे वाट बघावी लागली. भारताच्या फुटबॉल इतिहासाच्या नजीकच्या काळातील हा मोठा विजय ठरावा. आता या विजयावरून आम्हाला नवी इमारत बांधायची आहे.’’

कॉन्स्टटाईन यांनी या वेळी पुन्हा एकदा गुआमविरुद्धचा पराभव अजूनही मनाला बोचतो हे बोलून दाखवले. ते म्हणाले, ‘‘एखादा सामना असा असतो, की तो कधीच विसरला जात नाही. या सामन्यात तर आम्ही हरलो होतो. तो पराभव अजूनही मला बोचतोय. त्याला अनेक कारणं आहेत. त्या वेळी झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी आम्ही या वेळी घेतली. आत्मविश्‍वास आणि सरळ विचाराने आम्ही मैदानात उतरलो. यापूर्वी झालेल्या चुका पुन्हा होऊ द्यायच्या नाहीत हे प्रत्येकाच्या मनावर ठसले होते. पुन्हा आम्हाला त्यात अडकायचे नव्हते. त्यामुळे हा विजय खूप काही देऊन आणि शिकवून गेला.’’

loading image