अर्जेंटिनाचा दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था
Wednesday, 22 June 2016

फॉक्‍सबोरो (अमेरिका) - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य अर्जेंटिनाने अमेरिकेचा 4-0 असा सहज पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यातही लिओनेल मेस्सीची चमक दिसून आली. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 55 वा गोल करत, अर्जेटिनाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे.

अर्जेंटिना आणि अमेरिका यांच्यात उपांत्य फेरीची लढत झाली. भरात असलेल्या मेस्सीला रोखण्याचे खरे आव्हान अमेरिकेसमोर होते. मात्र, अमेरिकेच्या खेळाडूंना मेस्सीला रोखण्यात अपयश आले. त्याने स्वतः एक गोल केला. तर, हिग्वेनला एका गोल करण्याची संधी करुन दिली. लावेझीने तिसऱ्याच मिनिटाला गोल करुन अर्जेंटिनाला सुरवातीलाच आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर 32 व्या मिनिटाला मेस्सीने 25 यार्डवरुन मारलेली अप्रतिम फ्रि कीक अमेरिकेचा गोलकिपर ब्रॅड गुझान अडविण्यात अपयशी ठरला. या गोलमुळे अर्जेंटिनाला मध्यांतरापूर्वीच 2-0 अशी आघाडी घेता आली. 

दुसऱ्या सत्रातही अर्जेंटिनाच्या खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. गोंझाले हिग्वेन याने 50 व्या मिनिटालाच गोल करत आघाडी आणखी वाढविली. अखेर सामन्याच्या अखेरच्या क्षणी म्हणजे 86 व्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर हिग्वेनने सहज गोल नोंदवत संघाला 4-0 असा विजय मिळवून दिला. अर्जेंटिनाचे 1993 नंतर प्रथमच ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. अर्जेंटिनाचा अंतिम सामना कोलंबिया आणि चिली यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. अमेरिका तिसऱ्या स्थानासाठी या दोन्ही संघातील पराभूत संघाशी खेळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argentina reaches final; Messi shines