मेस्सीच्या अर्जेंटिनाचे आव्हान धोक्‍यात

वृत्तसंस्था
Saturday, 23 June 2018

मेस्सीच्या मोठेपणामुळे अर्जेंटिना संघाचे अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचा परिणाम आम्हाला या पराभवाच्या रूपाने भोगावा लागला.
जॉर्ज सॅम्पोली, अर्जेंटिनाचे प्रशिक्षक

निझनी, ता. 22 ः जगभराचे लक्ष लागून राहिलेला लिओनेल मेस्सीची झालेली कोंडी आणि गोलरक्षक कॅबॅल्लेरो याने केलेल्या चुकांची भरपाई अर्जेंटिनाला चांगलीच महागात पडली. "ड' गटात झालेल्या सामन्यात त्यांना क्रोएशियाकडून 0-3 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.

पहिल्या सामन्यातील बरोबरी आणि दुसऱ्या सामन्यातील पराभव यामुळे अर्जेंटिनाचे स्पर्धेतील आव्हान धोक्‍यात आले आहे. सेनेगल आणि नायजेरिया यांच्यात होणाऱ्या सामन्यावर त्यांच्या आव्हानाची धुगधुगी अवलंबून राहील. सेनेगलने हा सामना जिंकल्यास क्रोएशियाविरुद्ध अखेरच्या सामन्यातील बरोबरीदेखील सेनेगलला बाद फेरीत घेऊन जाईल. नायजेरियाविरुद्ध मोठ्या गोलफरकाने मिळविलेला विजयही त्यांना वाचवू शकणार नाही.

गोलरक्षक कॅबॅल्लेरो याने केलेल्या चुका आणि अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी एकूणच दाखवलेला आळशीपणा त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरतात. उत्तरार्धात 53व्या मिनिटाला क्रोएशियाची चाल उधळून लावण्यात अर्जेंटिनाचा गोलरक्षक कॅबॅल्लेरो याने पुढे येण्याची घाई केली. आंटे रेबिच याने त्याला चकवून अगदी सहजपणे चेंडूला जाळीची दिशा दिली. त्यानंतर कर्णधार मोडरिच याने "डी'च्या लाइनवरून मारलेल्या किकने कॅबॅल्लेरो पुन्हा चकला. दोन गोल झाल्यामुळे अर्जेंटिनाच्या आव्हानातील अवसानच गळून गेले. त्यात भरपाई वेळेतील रॅकिटीचचा गोल अर्जेंटिना खेळाडू आणि चाहत्यांच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळून गेला. अर्जेंटिनात माहीत नाही, पण इकडे मैदानात अर्जेंटिना चाहत्यांच्यात अश्रूंचा पूर आला होता. अर्जेंटिनासाठी सगळे संपल्यात जमा आहे. आता त्यांना सेनेगल-नायजेरिया लढतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

संपूर्ण सामन्यात मेस्सीचे आस्तित्वच जाणवले नाही. पूर्वार्धात याची सल अधिक जाणवली. त्यामुळे उत्तरार्धात दडपण अधिक वाढले. ते हिग्युएन आणि डिबाला यापैकी कुणी कमी करू शकले नाही. पूर्वार्धात मेस्सीला गोल करण्याची मिळालेली संधी त्याचाच व्यावसायिक मित्र रॅकिटीचने फोल ठरवली. त्यापूर्वी पूर्वार्धातच रेगाने दवडलेल्या संधीचेदेखील अर्जेंटिनाला आता वाईट वाटत असेल. रेगाने किक मारली खरी, पण चेंडू पोलच्या जवळून बाहेर गेला. हे दोन क्षण वगळता अर्जेंटिनाला सामन्यात टिकून राहताच आले नाही. त्यांचा खेळ कमालीचा आळशी होता. त्याची अनेक उदाहरणे या सामन्यातून देता येतील. उलट क्रोएशिया संघ अचूक खेळत होता. त्यांनी पास आणि चेंडूवरील ताबा जरूर कमी मिळविला. पण, जेव्हा या दोन्ही गोष्टींची संधी मिळाली, तेव्हा त्यांच्या खेळात अचूकता होती.

मैदानावर छाप पाडताना एकटा पडलेल्या मेस्सीला प्रत्येक गोलनंतर आणि सामन्यानंतर मैदान सोडताना चेहऱ्यावरील निराशा लपवता येत नव्हती. सहाकारी त्याच्यासाठी काहीच करू शकले नाहीत. त्यामुळे वैयक्तिक गुणवत्तेला सांघिक जोड न मिळाल्यावर या आघाडीवर सरस राहिलेल्या क्रोएशियासमोर त्यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argentina's World cup hopes in danger