esakal | रांगा टाळण्यासाठी चाहत्यांना फॅन पार्क टाळण्याचा "सल्ला' 
sakal

बोलून बातमी शोधा

 To Avoid the line Advice Fan Park

रशियातील स्पर्धा प्रतिसादाच्या आघाडीवर "सुपरहिट' ठरली असली, तरी संयोजकांसमोर वेगळीच डोकेदुखी निर्माण झाली आहे. "फिफा'ने विविध ठिकाणी अधिकृत "फॅन झोन' तयार केले आहेत.

रांगा टाळण्यासाठी चाहत्यांना फॅन पार्क टाळण्याचा "सल्ला' 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रशियातील स्पर्धा प्रतिसादाच्या आघाडीवर "सुपरहिट' ठरली असली, तरी संयोजकांसमोर वेगळीच डोकेदुखी निर्माण झाली आहे. "फिफा'ने विविध ठिकाणी अधिकृत "फॅन झोन' तयार केले आहेत. तेथील भव्य स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी गर्दी उसळत आहे, पण या ठिकाणी प्रेक्षकांची कमाल क्षमता केवळ 25 हजार आहे. गटातील निर्णायक सामन्यांच्या वेळी "फॅन झोन'मधील गर्दी आणखी वाढण्याची दाट शक्‍यता आहे. अशावेळी प्रेक्षकांनी "फॅन झोन'मध्ये येऊ नये. त्यांनी हॉटेल, बार, कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये सामने पाहावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. एक कोटी 20 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात अशी गर्दी होणार, यादृष्टीने संयोजकांनी तयारी करायला हवी होती, अशी टीका होऊ लागली आहे. मॉस्को विद्यापीठाच्या स्पॅरो हिल्स परिसरातील "फॅन झोन'मध्ये जाण्यास असंख्य प्रेक्षक आतुर आहेत; पण इतर अनेक ठिकाणी "स्क्रीन लावण्यात आले आहेत, त्या ठिकाणांना पसंती द्यावी. तेथे जाण्यासाठी तुम्हाला रांगा लावाव्या लागणार नाही. आत गेल्यानंतर ड्रिंक्‍स आणि स्नॅक्‍स घेण्यासाठीही रांगेत थांबावे लागणार नाही. खुल्या "फॅन झोन'प्रमाणेच तेथील वातावरण भारलेले असेल, असा युक्तिवाद करणारे निवेदन मॉस्कोच्या क्रीडा आणि पर्यटन खात्याचे प्रमुख निकोलाई गुल्याएव यांनी केले. 

एक बोनस गेला, दुसरा मिळाला 
नायजेरियासाठी विश्‍वकरंडक स्पर्धा सनसनाटी ठरत आहे. पहिला सामना जिंकल्यास खेळाडूंना प्रत्येकी सव्वा लाख नैरा बोनस मिळेल असे जाहीर झाले होते. पहिल्या सामन्यात क्रोएशियाकडून हरल्यामुळे खेळाडूंचा बोनस हुकला. प्रत्येक सामन्यासाठी त्यांच्या फुटबॉल महासंघाने असा बोनस जाहीर केला होता. आइसलॅंडला हरवून नायजेरियाने खळबळ उडवून दिली, त्यामुळे त्यांचा दुसरा बोनस नक्की झाला. ही रक्कम एक लाख 87 हजार 500 नैरापर्यंत वाढविल्याचे वृत्त मात्र महासंघाने फेटाळून लावले. "एटीओ' कंपनी नायजेरिया संघाची प्रायोजक आहे. प्रत्येक विजयासाठी 50 हजार अमेरिकी डॉलरचे बक्षीस त्यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संसदेचे अध्यक्ष बुकोला साराकी यांनीही तेवढ्याच रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे.