'जेडीटी'विरुद्ध धडाक्‍याचा बंगळूरचा निर्धार 

वृत्तसंस्था
Wednesday, 19 October 2016

आम्ही या लढतीविषयी अजिबात गाफील नाही. उपांत्य फेरीची लढत अजून पूर्ण झालेली नाही. घरच्या मैदानावरील आमची कामगिरी चांगली झालेली आहे. आता निर्णायक क्षणी आम्हाला याची पुनरावृत्ती करावी लागेल. 
- सुनील छेत्री, बंगळूर एफसीचा फुटबॉलपटू 

बंगळूर : बंगळूर एफसीची एएफसी करंडक फुटबॉल स्पर्धेत येथील श्री कांतिरवा स्टेडियमवर उपांत्य फेरीत घरच्या मैदानावरील सामन्यात बुधवारी मलेशियाच्या जोहोर दारुल ताझीम (जेडीटी) संघाविरुद्ध लढत होईल. आय-लीग विजेत्या बंगळूरसमोर विद्यमान विजेत्या 'जेडीटी'चे कडवे आव्हान असेल. 

प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील सामन्यात बंगळूरने 1-1 अशी बरोबरी साधली. त्या वेळी युजीन्सन लिंगडोह याने अप्रतिम गोल केला होता. 'जेडीटी'चे प्रशिक्षक मारिओ गोमेझ यांच्यासमोर जोर्गे पेरेय्रा डॅझ, महंमद आम्री याहयाह आणि जुआन मार्टन ल्युसेरो या आघाडी फळीतील त्रिकुटाची गैरहजेरी जाणवेल. यामुळे डावपेच आखण्याचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अशावेळी या लढतीपूर्वी त्यांनी सावध दृष्टिकोन ठेवला आहे. ते म्हणाले, की 'तीन प्रमुख खेळाडूंची उणीव आम्हाला नक्कीच जाणवेल, पण अंतिम फेरीतील प्रवेश नक्की करण्यासाठी आम्हाला आमच्या बलस्थानांचा फायदा उठवावा लागेल.' 

गोमेझ यांनी बंगळूर एफसी संघाची प्रशंसा करताना आढेवेढे घेतले नाहीत. ते म्हणाले की, 'आमच्या देशातील सामन्यात बंगळूरने अप्रतिम कामगिरी केली. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर गोल केल्यामुळे त्यांचे पारडे जड असेल. अर्थात मी कसून सरावावर भर देणारा माणूस आहे आणि आम्ही येथे जिंकण्याच्याच उद्देशाने आलो आहोत.' 

बंगळूर एफसीचे प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांचा या लढतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन भव्य आहे. स्पेनचे रोका म्हणाले की, ही लढत भारतीय फुटबॉलसाठी खास ठरेल. आमचा संघ आक्रमक फुटबॉल खेळण्यापासून परावृत्त होणार नाही. आम्ही असा धडाका कायम ठेवू. मलेशियामध्ये आम्ही गोल केल्याची कल्पना आहे आणि ते महत्त्वाचे आहे. अर्थात म्हणून आम्ही गाफील राहणार नाही. आम्ही बचावात्मक खेळावर भर देणार नाही. आम्ही मैदानावर उतरून आणखी गोल करण्यासाठी प्रयत्नशील राहू. बचावात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही अंतिम फेरी गाठू शकणार नाही.' 

लिंगडोह हासुद्धा पत्रकार परिषदेस उपस्थित होता. त्याने सांगितले की, भारतीय फुटबॉलमध्ये इतिहास घडविण्याचा आमचा निर्धार आहे. आम्हाला भव्य पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व अभिमानाने करायचे आहे. आम्ही क्षमतेनुसार खेळ केला आहे, पण अद्याप आमच्यासमोरील आव्हान पूर्ण झालेले नाही. आम्हाला बुधवारी घरच्या मैदानावर खेळ उंचावण्याची गरज आहे. 

थेट प्रक्षेपण 
स्टार स्पोर्टस 1 
वेळ सायंकाळी 7


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangalore FC to face JDT on home turf