बार्सिलोनाचा ऐतिहासिक षटकार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 March 2017

चार गोलच्या पिछाडीनंतर विजय; अखेरच्या सात मिनिटांत तीन गोल
बार्सिलोना - खडतर आव्हान असतेच, त्याच वेळी खेळ उंचावणारा संघ इतिहास घडवतो, हेच बार्सिलोनाने दाखवून दिले. पहिल्या टप्प्यात पीएसजीविरुद्ध चार गोलनी हार पत्करलेले बार्सिलोना 88 व्या मिनिटापर्यंत मागे होते, पण सात मिनिटांत तीन गोल करीत बार्सिलोनाने इतिहास घडवला.

पूर्वार्धातील दोन गोलच्या आघाडीनंतरही बार्सिलोनाचा गोलांचा षटकार कोणासही अपेक्षित नव्हता; पण त्यांनी घरच्या मैदानावरील दुसरा टप्पा 6-1 आणि ही लढत एकत्रितपणे 6-5 अशी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. फुटबॉल लोकांना वेडे करतो. हा सामना कोणीही विसरणार नाही. पहिल्या टप्प्यात हरल्यानंतर टीकाकारांनी लक्ष्य केले; पण चाहत्यांनी विश्‍वास ठेवला. हा विजय चाहत्यांचाच आहे, असे बार्सिलोनाचे व्यवस्थापक लुईस एन्रिक यांनी सांगितले.

बार्सिलोना दडपणाखाली असेल, चाहते नाराज असतील, ही बहुदा पीएसजीची अपेक्षा होती. त्यांनी पहिल्या टप्प्यातील विजयी संघास साजेशी आक्रमक सुरवात करण्याऐवजी बचावावर भर दिला. त्यातच एकदा पेनल्टी किक नाकारली गेल्यावर ते अधिकच बचावावर गेले. बार्सिलोनाने जोरदार आक्रमणे करीत पीएसजीला सतत दडपणाखाली ठेवले. बार्सिलोनाचा भर पूर्ण आक्रमणावर असेल, त्यामुळे पीएसजीचे एखादे यशस्वी प्रतिआक्रमणही बार्सिलोनावरील दडपण वाढवेल, हा तज्ज्ञांचा अंदाज होता. प्रत्यक्षात नियोजनबद्ध आक्रमणामुळे पीएसजीला क्वचितच प्रतिआक्रमण करता आले आणि इतिहास घडला.

बार्सिलोनात रस्त्यावर जल्लोष
स्टेडियम परिसरातच नव्हे, तर बार्सिलोनात चाहते रस्त्यावर नाचून संघाचा विजय साजरा करीत होते. प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला होता. प्रत्येकाला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नव्हते. अनेक फुटबॉल तज्ज्ञांना पीएसजीचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश गृहीत धरला याचे दुःख होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: barcelona win in football match