बेल्जियम-इंग्लंडदरम्यान पुन्हा 'नकोशी' लढत

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जुलै 2018

जवळपास दोन आठवड्यांपूर्वी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील साखळीतील लढत झाली ती गटात दुसरे स्थान मिळवण्याकरिता विजय टाळण्यासाठी; तर आता उपांत्य फेरीतील पराभवाचे दुःख विसरण्यासाठी घरी परतण्याची ओढ लागलेली असताना त्यांच्यावर तिसऱ्या क्रमांकाची लढत खेळण्याची वेळ आली आहे.

सेंट पीटर्सबर्ग : जवळपास दोन आठवड्यांपूर्वी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील साखळीतील लढत झाली ती गटात दुसरे स्थान मिळवण्याकरिता विजय टाळण्यासाठी; तर आता उपांत्य फेरीतील पराभवाचे दुःख विसरण्यासाठी घरी परतण्याची ओढ लागलेली असताना त्यांच्यावर तिसऱ्या क्रमांकाची लढत खेळण्याची वेळ आली आहे.

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीचा उद्देश काय, असाच प्रश्‍न वारंवार विचारला जातो; पण जागतिक महासंघ त्यात बदल करण्यास तयार नाही. इंग्लंड आणि बेल्जियम या प्रतिस्पर्धी संघांनी ही लढत खेळणे भाग असल्याचेच सांगितले.
 तिसऱ्या क्रमांकाची लढत खेळण्यास कोणताच संघ तयार नसतो, असे इंग्लंड संघाचे मार्गदर्शक गेरेथ साऊथगेट यांनी सांगितले होते; पण त्याचवेळी ही लढत जिंकणे आम्हाला आवडेल. सर्वोत्तम कामगिरी केल्याचा अभिमान कोणत्याही संघाला हवा असतो. उपांत्य फेरीतील पराभवानंतर याचा विचार अवघड आहे, असेही ते म्हणाले. 

बेल्जियम मार्गदर्शक रॉबर्टो मार्टिनेझ यांचे मत वेगळे नव्हते. उपांत्य फेरीतील पराभवाने निराश असता, त्याचवेळी अन्य एका लढतीसाठी स्वतःला तयार करणे अवघड असते. पराभवातून सावरून तिसरा क्रमांक मिळविण्याची संधी साधण्याचा आम्ही प्रयत्न करू. ही संधी वारंवार येत नाही, असेही ते म्हणाले. 
बेल्जियम आणि इंग्लंडचे मार्गदर्शक भविष्याचा विचार करूनच या लढतीसाठी संघ निवडतील. दोघांतील अखेरच्या साखळी लढतीसाठी बेल्जियमने नऊ बदल केले होते, तर इंग्लंडने आठ. दोघांनीही विजय टाळण्याचा प्रयत्न केला. बेल्जियम 1-0 जिंकले. त्यांची लढत झाली ती जपान, ब्राझील आणि फ्रान्सविरुद्ध, तर इंग्लंडचा सामना झाला तो कोलंबिया, स्वीडन, क्रोएशियाविरुद्ध. नकारात्मक खेळ केलेले दोन्ही संघ तिसऱ्या क्रमांकासाठीच लढणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgium vs England match Football World Cup