विजयानंतरही बेल्जियमचा प्रवास कठीण बचावात्मक खेळ करत इंग्लंडने संभाव्य धोका टाळला

वृत्तसंस्था
Saturday, 30 June 2018

विश्‍वकरंडक स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढती तुलनेत निराशाजनक झाल्या. यातही स्पर्धेतील पुढील प्रवास डोळ्यांसमोर ठेवून इंग्लंडने बेल्जियमविरुद्ध खेळ करत संभाव्य धोका टाळला. त्याचवेळी विजयानंतरही बेल्जियमचा प्रवास कठीण झाल्याचेच चित्र दिसत आहे.

मॉस्को, ता. 29 : विश्‍वकरंडक स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढती तुलनेत निराशाजनक झाल्या. यातही स्पर्धेतील पुढील प्रवास डोळ्यांसमोर ठेवून इंग्लंडने बेल्जियमविरुद्ध खेळ करत संभाव्य धोका टाळला. त्याचवेळी विजयानंतरही बेल्जियमचा प्रवास कठीण झाल्याचेच चित्र दिसत आहे.

यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक गोल बेल्जियम आणि इंग्लंड संघांकडूनच नोंदले गेले आहेत. त्यामुळे एकमेकांविरुद्ध खेळताना ते काय नियोजन ठेवतात, हे महत्त्वाचे होते. यात इंग्लंडचे एक पाऊल पुढे पडले असेच म्हणायला जागा आहे. त्यांनी बाद फेरीतील आव्हानांचा विचार करताना प्रमुख खेळाडूंना विश्रांतीचा निर्णय घेत त्यांनी सुरक्षित खेळ केला. अर्थात, बेल्जियमने एकदा त्यांचा बचाव भेदत विजय मिळविला. अदनान जानुजाझ याने हा गोल केला. त्यामुळे इंग्लंडला गटात दुसऱ्या क्रमांकावर राहता आले. सामना हरल्यानंतरही त्यांच्या नियोजनाचा विजय झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. त्यांनी पुढील प्रवास सुकर करताना ब्राझीलशी लढावे लागणार नाही, याची काळजी घेतली.

दुसरीकडे मात्र बेल्जियमचा प्रवास कठीण झाला असे म्हणायला जागा आहे. बाद फेरीतील त्यांचा पहिला सामना जपानविरुद्ध आहे. विश्‍वकरंडकातील त्यांच्यासाठी सोपा पेपर ठरेल; पण त्यानंतर त्यांच्यासमोर पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलचे आव्हान राहणार आहे. इंग्लंडची पहिली गाठ कोलंबियाशी असून, हा अडथळा पार केल्यास त्यांना "डबल एस'पैकी (स्वित्झर्लंड किंवा स्वीडन) एका "एस' विरुद्ध खेळावे लागेल.

सामन्यापूर्वी बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबेर्टो मार्टिनेझ यांनी विजयास प्राधान्य न देता संघात नऊ बदल केले. सामन्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता होती. मात्र, आपल्या मतावर ठाम राहत आम्ही कुणाचेही आव्हान पेलण्यास समर्थ आहोत, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""विजय किंवा पराभव हे आमचे नियोजन नाही. भविष्यात सोपा स्पर्धक डोळ्यांसमोर ठेवून खेळणे असा विचार कधीच कुणी करत नाही. आम्ही कुणाचेही आव्हान पेलू शकतो. आम्ही सज्ज आहोत.''

इंग्लंड प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनीदेखील संघात मोठे बदल करून खेळाडूंकडून सुरक्षित खेळ करवून घेतला. सामन्यादरम्यान खेळाडूंना सल्ला देण्यापेक्षा त्यांचा कल खेळाडूंच्या अभ्यासाकडेच अधिक होता. त्यामुळे उत्तरार्धात काही सोप्या संधी दवडल्यानंतरही ते शांत होते. एकूणच संथ खेळ करणाऱ्या इंग्लंडने अखेरच्या अर्ध्या तासात बरोबरी करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beljium vs England Football world cup