esakal | बेल्जियमचा पिछाडीवरून जपानला "काउंटरपंच
sakal

बोलून बातमी शोधा

Beljium vs Japan Football world cup

बेल्जियमने विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत दोन गोलांच्या पिछाडीवरून जपानचा प्रतिकार प्रतिआक्रमणाच्या जोरावर मोडून काढला. चार मिनिटांच्या भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाला बदली खेळाडू नेसर चॅड्‌ली याने केलेला गोल निर्णायक ठरला.

बेल्जियमचा पिछाडीवरून जपानला "काउंटरपंच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रोस्तोव, ता. 2 : बेल्जियमने विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत दोन गोलांच्या पिछाडीवरून जपानचा प्रतिकार प्रतिआक्रमणाच्या जोरावर मोडून काढला. चार मिनिटांच्या भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटाला बदली खेळाडू नेसर चॅड्‌ली याने केलेला गोल निर्णायक ठरला. सामन्यातील पाचही गोल दुसऱ्या सत्रात झाले. बेल्जियमची उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलशी लढत होईल. 
दुसऱ्या सत्रात जपानने चार मिनिटांत दोन गोल करीत दमदार आघाडी घेतली. बेल्जियमने एडन हॅजार्ड आणि रोमेलू लुकाकू यांचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतरही प्रयत्न सोडून दिले नाहीत. पाच मिनिटांत दोन गोल करीत बेल्जियमने बरोबरी साधली होती. 

दुसऱ्या सत्रात तिसऱ्याच मिनिटाला बेल्जियमचा जेन व्हेर्टोंगेन जपानच्या गाकू शिबासाकीला चेंडूवर ताबा मिळविण्यापासून रोखू शकला नाही. शिबासाकीने वेगाने धावत गेन्की हारागुचीला पास दिला. हारागुचीने पेनल्टी बॉक्‍समध्ये उजवीकडून प्रवेश करीत संयमाने फटका मारत प्रतिस्पर्धी गोलरक्षक थिबौट कोर्टोईसला चकविले. 
या धक्‍क्‍यातून सावरत बेल्जियमने प्रयत्न केला, पण हॅजार्डने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. यानंतरही जपानने जोरदार खेळ सुरू ठेवला. शिंजी कागावाने पेनल्टी बॉक्‍सपाशी चेंडूवर ताबा मिळविला. त्याने धूर्तपणे ताकाशी इनुईला बॅकपास दिला. मग इनुईने नेटच्या उजव्या कोपऱ्यात मैदानालगत ताकदवान फटका मारत कोर्टोईसला हताश केले. 

बेल्जियमचे खाते कॉर्नरवर उघडले. व्हेर्टोंगेन याने अफलातून हेडिंग करीत उंचावरून भिरभिरत मारलेला चेंडू नेटमध्ये गेला तेव्हा जपानचा गोलरक्षक इजी कावाशीमा चकित झाला. बेल्जियमचा दुसरा गोल आणखी प्रेक्षणीय ठरला. हॅजार्डच्या क्रॉस पासवर बदली खेळाडू मारौयानी फेलायनी याने उंच उडी घेत हेडिंगने नेटमध्ये मारला. 
पहिल्या सत्रात बेल्जियमने चेंडूवरील ताब्यात 56-44 असे वर्चस्व राखले होते. बेल्जियमने पाच कॉर्नर मिळवले, पण एकाही संधीचा त्यांना फायदा उठविता आला नाही. जपानला एकही कॉर्नर मिळविता आला नाही. 

निकाल :
बेल्जियम : 3 (जेन व्हेर्टोंगेन 69, मारौयानी फेलायनी 74, नेसर चॅड्‌ली 90-4) विवि जपान : 2 (गेन्की हारागुची 48, ताकाशी इनुई 52)