ब्राझीलची अखेर विजयाची भरपाई

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

सेंट पीटर्सबर्ग, ता. 22 ः कोस्टा रिकाचा दस का दम मोडीत काढत ब्राझीलने सर्वच अपयशाची भरपाई केली. त्यांनी खेळाडूंच्या दुखापतीमुळे वाढवण्यात येणाऱ्या वेळेत दोन गोल करीत अखेर विश्‍वकरंडक स्पर्धेतील पहिला विजय मिळविला. नेमारचा गोलही ब्राझीलला सुखावणारा होता.

सेंट पीटर्सबर्ग, ता. 22 ः कोस्टा रिकाचा दस का दम मोडीत काढत ब्राझीलने सर्वच अपयशाची भरपाई केली. त्यांनी खेळाडूंच्या दुखापतीमुळे वाढवण्यात येणाऱ्या वेळेत दोन गोल करीत अखेर विश्‍वकरंडक स्पर्धेतील पहिला विजय मिळविला. नेमारचा गोलही ब्राझीलला सुखावणारा होता.
नेमारसाठी ही लढत आनंद व दुःख यांचे मिश्रण होती. पूर्वार्धात कोस्टा रिकाचे खेळाडू बचावपटूंची गर्दी करून त्याच्याकडून चेंडू काढून घेत होते. उत्तरार्धात नेमार पेनल्टी किकसाठी सिद्ध होत असताना रेफरींनी व्हिडिओची मदत घेण्याचे ठरवले आणि पेनल्टी किक रद्द केली. नेमारचा विश्‍वकरंडक स्पर्धेतील गोलदुष्काळ कायम राहील असेच वाटले होते; पण अखेर त्याने भरपाई वेळेतील सातव्या मिनिटास गोल करीत ब्राझीलचा विजय निश्‍चित केला, त्यापूर्वी सहा मिनिटे म्हणजे भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास कुटिन्होने ब्राझीलचे खाते उघडले होते.
कोस्टा रिकाने अतिबचावात्मक खेळ करून जणू पराभवास निमंत्रण दिले. तब्बल दहा खेळाडू बचावात ठेवल्याने त्यांना सतत आक्रमणाचा सामना करावा लागला. गोल रोखण्याचे दडपण जास्त असते, त्याचा अनुभव त्यांनी घेतला. सतत होणारे हल्ले परतवताना त्यांची दमछाक झाली. सेल्सो बोर्जेस याचा एकमेव शॉट सोडल्यास कोस्टा रिका कधीही गोल करतील, असे वाटले नाही. त्यामुळे ब्राझीलचे काम सोपे होत गेले.
ब्राझीलने दोन्ही बगलांतून आक्रमणाचा धडाका करीत कोस्टा रिकावर दडपण आणले. कदाचित सात मिनिटांच्या वाढवलेल्या वेळेने त्यांनी हार पत्करली असावी. ब्राझीलला सलग दुसरी बरोबरी स्वीकारावी लागणार, असे वाटत असतानाच कुटिन्हो याने रॉबर्टो फिर्मिनोच्या अचूक पास सत्कारणी लावला. त्यानंतर काही सेकंद असताना डग्लस कोस्टाच्या टॅपवर चेंडूला नेमारने अचूक दिशा दिली. या विजयासह ब्राझीलने गटात आघाडी घेतली. आता गटातील हीच क्रमवारी कायम राहिली तर ब्राझीलची बाद फेरीत सुरवातीसच लढत जर्मनीविरुद्ध होऊ शकेल.

लढत विशेष
- ब्राझील 1994 च्या अमेरिकन स्पर्धेनंतर प्रथमच निळा पोषाख घालून खेळले, त्या वेळी स्वीडनविरुद्धच्या उपांत्य लढतीत 1-0 असा विजय
- नेमारने पूर्वार्धात 17 वेळा चेंडूवरील नियंत्रण गमावले, अन्य ब्राझील खेळाडूंपेक्षा किमान आठने जास्त
- या स्पर्धेतील आत्तापर्यंत 24 पैकी 11 लढतीत पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी
- फिलिप कुटिन्हो याने भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास गोल केला
- नेमारचा ब्राझीलसाठीचा 56 वा गोल, सर्वाधिक गोलच्या ब्राझील क्रमवारीत रोमारिओस मागे टाकले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazil beats Costa Rica