esakal | रेयाल माद्रिद विजेते
sakal

बोलून बातमी शोधा

gareth-bale

रेयाल माद्रिद विजेते

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

किएव - रेयाल माद्रिदचा बदली हुकमाचा एक्का गेराथ बेल याचे दोन चमकदार गोल आणि लिव्हरपूल गोलरक्षक लॉरिस कॅरिअस यांच्या दोन चुका यांनी चॅंपियन्स लीग लढत गाजली. रेयाल माद्रिदने या स्पर्धेवरील हुकमत कायम राखत लिव्हरपूलचा ३-१ असा पाडाव करीत बाजी मारली. रेयाल माद्रिदचे हे सलग तिसरे, तर एकंदरीत तेरावे विजेतेपद ठरले. त्यांनी या यशासह युरोपातील आपली हुकमत सिद्ध केली.

बेल मैदानात उतरला, त्या वेळी एका तासाचा खेळ झाला होता आणि गोलफलक १-१ बरोबरी दर्शवत होता. बेल हा रेयालचा हुकमी एक्का ठरेल, असे तज्ज्ञांचे मत होते आणि तसेच घडले. मैदानात उतरल्यावर तिसऱ्याच मिनिटास आणि पाचव्यांदाच चेंडूस स्पर्श करताना त्याने अफलातून बायसिकल किक मारली आणि त्यानंतर काही वेळातच दीर्घ अंतरावरून लिव्हरपूलचा गोलरक्षक कॅरिअसला चकवले. कॅरिअसने त्यापूर्वी हाताने पास केलेल्या चेंडूवर किक करीम बेनझेमाने किक करीत मारत रेयालचे खाते उघडले होते. लिव्हरपूल काय मैदानात कोणालाही त्या वेळी गोल होईल, असे वाटले नव्हते. 

वेगवान आक्रमणासाठी प्रसिद्ध असलेल्या लिव्हरपूलला रेयालने सुरवातीस गोलपासून रोखले. खरे तर या वेळीच रेयालने अर्धी लढत जिंकली. त्यातच लिव्हरपूलचा आघाडीचा गोलस्कोअरर मोहंमद सालेह याचा खांदा ३१ व्या मिनिटास निखळला. खरे तर या दुखापतीने लिव्हरपूलचा कणाच मोडला. संघातील सर्वांचेच खांदे पाडले. ‘सर्जिओ रामोसबरोबर झालेल्या झटापटीत सालाह जखमी झाला. त्याचा संघास जबर धक्का बसला. आमचा जोषच हरपला आणि त्याचवेळी त्यांनी सूत्रे हाती घेतली,’ अशी कबुली लिव्हरपूलचे मार्गदर्शक जर्गन क्‍लॉप यांनी दिली. 

मोलाच्या लढतीत प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा पूर्ण अभ्यास करून त्यानुसार व्यूहरचना करण्यात, ती अमलात आणण्यात रेयाल वाक्‌बगार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. राईट बॅक दॅनी कारवाजॅल ३७ व्या मिनिटास जखमी झाला, करीम बेनझेमाचा गोल उत्तरार्धात नाकारला गेला, पण त्याचा रेयालवर परिणाम झाला नाही. त्यातच लिव्हरपूल प्रतिकार करणार असे वाटले, त्या वेळी बेलला मैदानात उतरवण्यात आले. या मोसमात बेलने अनेकदा बदली खेळाडू म्हणून येत प्रभावी कामगिरी केली आहे, तरीही त्याला सुरुवातीपासून मैदानात उतरवण्यात आले नाही; पण तरीही तोच सामन्यातील ट्रम्प कार्ड ठरला.

loading image