मॅंचेस्टर सिटीला हरवून मोनॅको उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 March 2017

मोनॅको - टेमोई बाकायोकाच्या शानदार हेडरच्या जोरावर मोनॅकोने मॅंचेस्टर सिटीचे आव्हान 3-1 असे मोडून काढत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मोनॅको - टेमोई बाकायोकाच्या शानदार हेडरच्या जोरावर मोनॅकोने मॅंचेस्टर सिटीचे आव्हान 3-1 असे मोडून काढत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील उपउपांत्यपूर्व सामन्यात मोनॅको संघाला 3-5 असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, घरच्या मैदानावर त्यांनी आपला खेळ उंचावत पहिल्या पराभवातील गोल पिछाडीभरून काढत मॅंचेस्टरला दोन लढतीनंतर 6-6 असे रोखले. त्या वेळी मॅंचेस्टरला सामन्यात आलेले अपयश महागात पडले. घरच्या मैदानावर मोनॅकोला नवोदित क्‍येलिन एम्बापेने आठव्याच मिनिटाला गोल करून आघाडीवर नेले. त्यानंतर त्यांच्या फॅबिनोनेही गोल केला.

उत्तरार्धात सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात 71 व्या मिनिटाला लेरॉय सॅनेने गोल करून मॅंचेस्टर सिटीचे आव्हान राखले. मात्र, सामना संपायला 13 मिनिटे असताना मोनॅकोच्या बाकायोने हेडवर गोल केला आणि सिटी संघाचे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे स्वप्न भंग पावले.

बार्सिलोनाकडून धक्कादायक पराभवानंतर पॅरिस सेंट जर्मेन्सचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर मोनॅकोने फ्रेंच संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत कायम ठेवले. उत्तरार्धात आम्ही चांगला खेळ केला, परंतु पूर्वार्धातील खेळ सुमार होता, असे मॅंचेस्टर सिटीचे प्रशिक्षक गॉर्डिला यांनी सांगितले. उत्तरार्धातील खेळ चांगला असला, तरी तो पुढील वाटचालीसाठी पुरेसा नव्हता, हेसुद्धा मान्य करावे लागेल. या स्पर्धेत खेळण्याइतका अनुभव आमच्या काही खेळाडूंकडे नव्हता, असेही मत गॉर्डिला यांनी मांडले. मोनॅको संघाच्या या विजयाचा शिल्पकार ठरलेला बाकायो उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यास बंदीमुळे मुकणार आहे.

ऍटलेटिको माद्रिदची आगेकूच
माद्रिद - ऍटलेटिको माद्रिदने सलग चौथ्या मोसमात चॅंपियन्स लीगमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. घरच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील बायर लेवेर्कुसेनविरुद्धची गोलशून्य बरोबरी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. या बरोबरीमध्ये गोलरक्षक जान ओब्लाकचे गोलरक्षण मोलाचे ठरले. पहिल्या टप्प्यात ऍटलेटिकोने 4-2 असा विजय मिळवला होता. दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात ओब्लाकने संघावर होणारे तीन गोल अडवले. सलग चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठणे सोपे नाही, असे मत ओब्लाकने सामन्यानंतर व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: champion league football competition