esakal | झुंजार डॉर्टमंडच्या पराभवाची चर्चाही मागे
sakal

बोलून बातमी शोधा

झुंजार डॉर्टमंडच्या पराभवाची चर्चाही मागे

झुंजार डॉर्टमंडच्या पराभवाची चर्चाही मागे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चॅंपियन्स लीग - बसवरील हल्ल्यानंतर 24 तासांत मैदानात उतरले; 2-3 हार 

डॉर्टमंड - आपल्या बसमध्ये तीन बॉम्बस्फोट झाल्यानंतरही डॉर्टमंडचा संघ 24 तासांच्या आत मैदानात उतरला. प्रतिस्पर्धी मोनॅकोच्या पाठीराख्यांनी डॉर्टमंडची जर्सी परिधान करीत त्यांनाच प्रोत्साहन दिले; पण अखेर मैदानावरील लढत जिंकण्यात ते अपयशी ठरले. 

मोनॅकोविरुद्ध पराजित झाल्यानंतरही सामना हरल्यापेक्षा डॉर्टमंडचे खेळाडू आपण स्फोटातून वाचलो, याबद्दल दैवाचे आभार मानत होते. मैदानात उतरेपर्यंत आमच्या मनात फुटबॉलचा विचारही मनात येत नव्हता, असेच संघातील प्रत्येक खेळाडू सांगत होता. त्याचबरोबर लढतीसाठी पुन्हा हॉटेल ते स्टेडियम प्रवास 24 तासांत करावा लागला, त्या वेळी कोणीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. 

चॅंपियन्स लीगचे संयोजक असलेल्या युरोपीय फुटबॉल संघटनेने आपला विचारच केला नाही. सामना 24 तासांतच होणार असल्याचे एसएमएसवरून कळवण्यात आले. खरे तर ही लढत काही दिवस तरी लांबणीवर टाकणे योग्य ठरले असते, या डॉर्टमंड मार्गदर्शक थॉमस टशेल यांच्या मताशी सर्वच सहमत होते. 

नवोदित खेळाडू किलाईन बॅप्पे याने दोन गोल करीत मोनॅकोला पहिला टप्पा 3-2 असा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. डॉर्टमंड खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रित करणेच अवघड जात होते. पूर्वार्धात ते 0-2 असे मागे पडले होते. मोनॅकोने या मोसमात 31 लढतींत 88 गोल केले आहेत. त्यांची योजनाबद्ध आक्रमणे लक्षवेधकच होती. त्यातही 18 वर्षीय बॅप्पे लक्ष वेधून घेत होता. साखळीत तो 25 मिनिटेच खेळला होता; पण त्याचा या लढतीतील खेळ परिपक्व खेळाडूस साजेसा होता.

loading image