रेयालचा बायर्नवर सहज विजय 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 April 2017

रोनाल्डोचे युरोपियन स्पर्धेत गोलांचे शतक 
म्युनिक - वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूस साजेसा खेळ करणाऱ्या रोनाल्डोने केलेल्या दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने बुधवारी चॅंपियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत बायर्न म्युनिकचा 2-1 असा पराभव केला. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रोनाल्डोने युरोपियन स्पर्धेत गोलांचे शतक करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. 

रोनाल्डोचे युरोपियन स्पर्धेत गोलांचे शतक 
म्युनिक - वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूस साजेसा खेळ करणाऱ्या रोनाल्डोने केलेल्या दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने बुधवारी चॅंपियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत बायर्न म्युनिकचा 2-1 असा पराभव केला. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रोनाल्डोने युरोपियन स्पर्धेत गोलांचे शतक करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. 

अर्टुरो व्हिडाल याने हेडरद्वारे गोल करून सामन्याच्या पूर्वार्धातच बायर्नला आघाडीवर नेले. पण, विश्रांतीपूर्वी काही क्षण आधी मिळालेल्या पेनल्टीचा फायदा रोनाल्डोने उठवताना रेयालला बरोबरी साधून दिली. 

रोनाल्डोला रोखण्यासाठी बायर्नने अथक प्रयत्न केले. पण, त्या नादात त्यांना एक खेळाडू गमवावा लागला. रोनाल्डोला टार्गेट करताना तीन मिनिटांत दोन वेळा त्याला पाडताना चूक केल्यानंतर बायर्नच्या जॅक मार्टिनेझला पंचांनी रेड कार्ड दाखवून बाहेर काढले. तेव्हापासून अखेरचा अर्धा तास बायर्नला दहा खेळाडूंसहच खेळावे लागले. सामना संपण्यास तेरा मिनिटे असतान रोनाल्डोने आपला लौकिक दाखवताना बायर्नचा गोलरक्षक मॅन्युएल न्युएर याला चकवले. त्याच्या पायामधून त्याने वेगवान किक लगावत जाळीचा अचूक वेध घेतला. 

पूर्वार्धात बायर्नने जरूर सामन्यावर नियंत्रण राखले. पण, उत्तरार्धात रेयालच्या वेगवान खेळापुढे त्यांचे धाबे दणादणले होते. रेयालने उत्तरार्धात तब्बल 23 वेळा गोलपोस्टवर आक्रमण केले. यावरूनच उत्तरार्धातील रेयालच्या आक्रमणाची धार लक्षात येईल. 

सामना सुरू होण्यापूर्वीच बायर्नला धक्का बसला. यंदाच्या मोसमात त्यांच्याकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या रॉबर्ट लेवांडोवस्की याला खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. बचावपटू मॅट्‌स हुमेल्सही खेळू शकला नाही. त्यामुळे रेयालच्या "बीबीसी'ला (बेल, बेन्झेंमा, ख्रिस्तिआनो रोनाल्डो) रोखण्यात ते फिके पडले. 
 

शतकवीर रोनाल्डो 
रोनाल्डोने 2013 मध्ये युरोपियन स्पर्धेत 50 गोल केले. त्यानंतर चार वर्षांनी त्याने गोलांचे शतक साजरे केले. त्याने गोलांचे अर्धशतक 96 सामन्यांत पूर्ण केले. यातील पहिले 32 गोल हे स्पोर्टिंग सीपी आणि युनायटेडकडून नोंदवले. गोलांचे दुसरे अर्धशतक त्याने 47 सामन्यांत पूर्ण केले. पण, यातील केवळ तीन गोलच चॅंपियन्स लीग स्पर्धेतील आहेत. 

युरोपियन स्पर्धेत सर्वाधिक गोल 
100 ख्रिस्तिआनो रोनाल्डो (143 सामने) 
97 लिओनेल मेस्सी (118 सामने) 
76 राऊल गोन्झालेझ (158 सामने) 
70 0 फिलिप्पो इंझागी (114 सामने) 

गोलांचे शतक, तर मला गाठायचेच होते. ते स्वप्न चॅंपियन्स लीगमध्ये आणि तेसुद्धा बायर्नसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध साकार झाले याचा अधिक आनंद आहे. 
- रोनाल्डो 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: champion league football competition