वर्ल्डकप फुटबॉलमध्येही चिनी ड्रॅगनचा शिरकाव 

वृत्तसंस्था
Friday, 22 June 2018

अवघ्या काही स्पर्धांत ऑलिंपिकमधील प्रबळ ताकद झालेला चीन आता विश्‍वकरंडक स्पर्धेतही हातपाय पसरत आहे. या स्पर्धेसाठी परदेशातून आलेल्या चाहत्यात चीन टॉप टेनमध्ये आहे. यापूर्वीच चीन कंपन्यांनी पुरस्कर्ते म्हणून फिफाबरोबर करार केला आहे. 

मॉस्को -अवघ्या काही स्पर्धांत ऑलिंपिकमधील प्रबळ ताकद झालेला चीन आता विश्‍वकरंडक स्पर्धेतही हातपाय पसरत आहे. या स्पर्धेसाठी परदेशातून आलेल्या चाहत्यात चीन टॉप टेनमध्ये आहे. यापूर्वीच चीन कंपन्यांनी पुरस्कर्ते म्हणून फिफाबरोबर करार केला आहे. 

मॉस्कोतील काही दिवसांपूर्वीचे उदाहरण चिनी प्रवेश दाखवण्यासाठी पुरेसे होईल. मेक्‍सिको - जर्मनी लढतीसाठी लुझनिकी स्टेडियमभोवती जमलेल्या चाहत्यात चार चिनी होते. त्यातील तिघांनी आदल्या दिवशी अर्जेंटिनाची कशी धक्कादायक कोंडी झाली याची चर्चा सुरू केली. तिकीट न मिळालेल्या मेक्‍सिको चाहत्यांनी जवळपास दुप्पट रक्कम देऊन तिकीट विकत घेतले. त्या तिघांनी नजीकच्या बारमध्ये जाऊन लढतीचा आनंद घेतला. 

चीन या स्पर्धेच्या निमित्ताने नवे मार्केट काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. सेप ब्लॅटर तसेच फिफा पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्या वेळी काही पुरस्कर्ते दूर जात होते. चीनमधील वॅंदा या कंपनीने ही संधी साधली. गतवर्षी विवो पुरस्कर्ते झाले तसेच मेंगनिऊ ही चीनमधील योगर्ट निर्माती कंपनीही. त्यामुळे या स्पर्धेत चीन नसला तरी प्रत्येक स्पर्धेच्या वेळी त्यांचा ठसा उमटत आहे. प्रत्येक सामन्याच्या वेळी टीव्हीवर स्कोअर झळकतो, त्या वेळी सोबत हिसेंसे या चीनमधील कंपनीचे नावही झळकते. 

जागतिक फुटबॉलमधील चीनी कंपन्यांबरोबर करारात पुढाकार घेणारे चीनबाबत कोणताही आक्षेप घेत नाही. गिआनी इनफॅंटिनो अध्यक्ष झाल्यापासून चिनी प्रभाव वाढला आहे, पण कुठेही विरोधाचा सूर उमटलेला नाही. आता चीनला ही संधी दिसली आहे.

चीनने यापूर्वीच विश्‍वकरंडक संयोजनासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. त्यांचे अध्यक्ष झी जिनपिंग हेही त्यास तयार आहेत, असे सांगितले जात आहे. ते फुटबॉलप्रेमी आहेत, त्यामुळे तेही या स्पर्धेच्या आयोजनास उत्सुक आहेत, असे सांगितले जात आहे. हे घडले तर पहिल्यांदा तिकिट खरेदी करणारा त्या वेळी विकणार नाही, असे एका चिनी चाहत्यांनी तिकिटाची विक्री केल्यावर हसत हसत सांगितले. 
 
चिनी चाहत्यांची वाढती संख्या 
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेदरम्यान चिनी चाहत्यांची वाढती उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी 2010 च्या स्पर्धेच्या वेळी 3 हजार 300, तर 2014 च्या स्पर्धेच्या वेळी 7 हजार 400 चाहते आले होते. आता रशियातील स्पर्धेच्या वेळी 40 हजार तिकिटांची विक्री चीनमध्ये झाली आहे. हे चिनी तिकीटधारक सामन्याला बसतीलच असे नाही, पण आपल्याकडील तिकिटांची ते खुबीने येथे विक्री करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese dragon enters in World Cup football