रोनाल्डोसाठी युव्हेंटसने मोजले 8 अब्ज रुपये

वृत्तसंस्था
Wednesday, 11 July 2018

फुटबॉल विश्‍वात लोकप्रियतेच्या कळसावर असणाऱ्या पोर्तुगालच्या ख्रिस्तिआनो रोनाल्डो याने अखेर आपला युरोपियन क्‍लब रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी दिली आहे. आता रोनाल्डो नव्या मोसमात इटलीच्या युव्हेंटस क्‍लबकडून खेळताना दिसेल.

माद्रिद : फुटबॉल विश्‍वात लोकप्रियतेच्या कळसावर असणाऱ्या पोर्तुगालच्या ख्रिस्तिआनो रोनाल्डो याने अखेर आपला युरोपियन क्‍लब रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी दिली आहे. आता रोनाल्डो नव्या मोसमात इटलीच्या युव्हेंटस क्‍लबकडून खेळताना दिसेल. रेयाल माद्रिद क्‍लबने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मॅचेस्टर युनायटेडकडून 2009 मध्ये रेयालकडे येताना रोनाल्डोचा (106 दशलक्ष डॉलर - अंदाजे 7 अब्ज रुपये) करार विक्रमी ठरला होता. आता युव्हेंटसशी जोडताना त्याने हा विक्रमही मोडला. युव्हेंटस आणि रेयाल माद्रिद यांनी त्याच्या ट्रान्सफर फीबाबत थेट माहिती दिली नसली, तरी स्पेनमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार युव्हेंटसने रोनाल्डोसाठी 123 दशलक्ष डॉलर म्हणजेच तब्बल 8 अब्ज रुपये मोजले आहेत.

 

रोनाल्डोचा हा वैयक्तिक करार विश्‍वकरंडक स्पर्धेतील विजेत्याला मिळणाऱ्या रकमेपेक्षा चार पट अधिक आहे. हा करार चार वर्षांसाठी असेल. रोनाल्डोने रेयाल माद्रिद चाहत्यांना खुले पत्र लिहून त्यांचे आभार मानले. रेयाल माद्रिद माझे एक कुटुंबच झाले होते. या क्‍लबच्या सर्वांनीच मला कायम साथ दिली. आपले सर्वांचे मनापासून आभार, असे त्याने म्हटले आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cristiano Ronaldo into Juventus